सोलापूर, 12 जानेवारी : वेळ रात्रीच्या साडे दहा ते अकराची होती. प्रवासी झोपेत होते आणि याचवेळी सोलापूर पुणे महामार्गावरुन धावत असलेली ही बस अचानक पुलाच्या सुरक्षारक्षक लोखंडी गार्डला धडकली आणि मोठा आवाज झाला. बसमधील प्रवाशांनी पाहिले असता बस चालकाने मान टाकली होती. यानंतर भीतीने प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. काळ आला पण वेळ नाही, असा काहीसा प्रकार काल रात्रीच्या सुमारास घडला.
एका तरुणाच्या प्रसंगावधनामुळे एसटी बस उजनी धरणात जलसमाधी घेण्यापासून वाचली आणि उदगीर-पुणे बसमधील 40 प्रवाशांचा जीव वाचला आहे. सुधीर रणे, असे या प्रवासी तरुणाचे नाव आहे. तो पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील रहिवासी आहे. बस पुलाच्या सुरक्षारक्षक लोखंडी गार्डला धडकल्यानंतर भीतीने प्रवाशांमधून आरडाओरड सुरू झाली. याचवेळी ड्रायव्हिंग येणाऱ्या एका युवकाने धाडस केले आणि बसच्या स्टेरिंगचा ताबा घेतला आणि हँडब्रेकवर बस थांबविली. यामुळे मोठा अनर्थ टळला. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पळसदेव हद्दीत अंगावर शहारे आणणारा हा प्रकार घडला.
उदगीर डेपो मधून पुण्याकडे बस नंबर (MH 24 AU 8065) निघाली होती. या बसमध्ये साधारण 40 प्रवाशी प्रवास करत होते. इंदापूर ओलांडून एसटी बस सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग वरून पळसदेव गावाच्या हद्दीत आल्यावर रात्री अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. बसचालक गोविंद सूर्यवंशी यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ते बस चालू असतानात स्टिअरिंगवरच कोसळले. यामुळे त्यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी गार्डला धडकली. मात्र, सुधीर रणे या तरुण प्रवाशाने प्रसंगावधन राखले आणि स्टिअरिंगचा ताबा घेत मोठा अनर्थ होण्यापासून सर्वांना वाचवले.
हेही वाचा - छतासह टॅक्सीचालकाचं शीरही झालं धडावेगळं; औरंगाबादमधील ऊसाच्या ट्रकचा भीषण अपघात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bus conductor, Pune solapur, Road accident, St bus accident