अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 30 मे - सध्याच्या काळात आपल्या कर्तृत्वानं महिला विविध क्षेत्रं पादाक्रांत करत आहेत. शेतीचा शोध महिलांनीच लावला सांगितलं जातं. त्यामुळे शेती क्षेत्रात पूर्वीपासूनच महिला कार्यरत आहेत. परंतु, सध्याच्या काळात काही महिला शेतकरी आधुनिक पद्धतीनं शेती करून लाखोंची कमाई करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पापरी गावच्या वर्षा टेकळे यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. पती व सासूच्या मदतीने त्या डाळिंबाच्या शेतीतून लाखोंची कमाई करत आहेत. माळरानावर सुरू केली डाळिंबाची शेती सोलापूर जिल्ह्याची डाळिंबाच्या शेतीसाठी ओळख आहे. मोहोळ तालुक्यातील पापरीच्या वर्षा टेकळे या प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी पती कुमार टेकळे व सासू जिजाबाई टेकळे यांच्या मदतीने पडीक माळरानावर डाळिंबाची शेती करण्याचा निर्णय घेतला. सहा एकर शेतीपैकी पाच एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली. आता याच डाळिंबाच्या शेतीतून त्या लाखोंची कमाई करत आहेत.
शेतीची सर्व कामे करतात वर्षा विशेष म्हणजे वर्षा या शेतीतील सर्व कामे स्वत: करतात. स्वत: ट्रॅक्टर चालवून कोळपणी, फवारणी यांसारखी शेती कामे करताना त्या पिकांची विशेष काळजी घेतात. सध्या सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाची शेती जास्त असली तरी अनेक बागा रोगांमुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र, वर्षा यांनी योग्य नियोजन आणि वेळेत औषध फवारणी केल्याने त्यांची बाग चांगली असून त्यातून भरघोस उत्पन्न मिळत आहे. पहिल्याच वर्षी 13 टन डाळिंब डाळिंबाची लागवड केल्यानंतर दीड वर्षांनी पहिला भार धरला. तेव्हा 13 टन डाळिंब निघाले. 90 ते 120 रुपये प्रतिकिलो दराने डाळिंब विकला. साधारणपणे पाच लाख खर्च झाल्यावर त्यांना दहा लाखाचे उत्पन्न मिळाले. यंदा दुसरे पीक असून कमीत कमी 30 टन माल निघेल. त्यातून जवळपास 25 ते 30 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा वर्षा यांनी व्यक्त केलीय. Solapur News : घर आहे की गार्डन, सर्व झाली अवाक्; सोलापूरकराचा भन्नाट प्रयोग, VIDEO सेंद्रीय खतांचा वापर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर डाळिंबीसाठी केला. देशी गाईचे गोमूत्र, शेण, काळा गूळ या पदार्थांचा खत म्हणून वापर केला. त्यामुळे डाळिंबाची गुणवत्ताही सुधारली आहे. मात्र, डाळिंबावर रोगराईचा लवकर प्रादुर्भाव होतो, त्यामुळे औषध फवारणीचीही गरज भासते, असे वर्षा टेकळे सांगतात. हमीभाव गरजेचा वर्षा यांनी एक एकर शेतीत केळीची लागवड केली आहे. शेतीतून उत्पन्न मिळत असले तरी नैसर्गिक संकटांमुळे शेतीत अनेकदा तोटा होण्याचा संभव असतो. त्यातच मजुरी आणि औषधांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. डाळिंबासारखी बाग जतन करणं खूप खर्चिक आहे. त्यामुळे शेती पिकांना हमीभाव असावा, असं वर्षा म्हणतात. सोलापूरच्या शेतकऱ्यानं आंब्याला दिलं चक्क शरद पवारांचं नाव! कारणही सांगितलं… Video कौटुंबिक पाठिंबा सासू आणि सुनेचे भांडण तसे प्रत्येक कुटुंबीयांना नवीन नाही. सिनेमा आणि दररोजच्या सिरीयल मधून आपण ते पाहतच आलो आहोत. परंतु वर्षा आणि जिजाबाई या त्याला अपवाद आहेत. वर्षा या सासू जिजाबाई यांच्या मदतीने सर्व निर्णय घेत असतात. त्याला पती कुमार टेकळे यांचीही कृतीशील साथ असते. वर्षा यांना शेतीची आवड असून घरची सर्व जबाबदारी सांभाळत त्या शेतीची सर्व कामे करतात. मुलगा प्रसादही कृषीतूनच पदवीचं शिक्षण घेत असून तोही शेती कामात मदत करतो.