अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 14 एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहानं साजरी होते. सोलापूर शहरात या जयंतीनिमित्त विशेष उत्साह असतो. या कालावधीमध्ये शहरात प्रबोधनात्मक सप्ताह साजरा होतो. त्यानिमित्तानं प्रत्येक जण बाबासाहेबांना आपल्यापद्धतीनं अभिवादन करतो. स्पर्श रंग कला परिवाराचा नावाजलेला कलाकार विपुल मिरजकर यांनी सुद्धा महामानवाला अनोख्या पद्धतीची आदरांजली वाहिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अशी विपूलची ओळख आहे. महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला अनोख्या पद्धतीनं तो आदरांजली वाहतो. त्यानं यंदा बाबासाहेबांचे 10, 132 फोटो वापरून बाबासाहेबांचे पोट्रेट बनवलं आहे.
कसं आहे पोट्रेट? स्पर्श रंग कला परिवाराची सर्व टीमसोबत विपूलनं पाच तासांमध्ये हे काम पूर्ण केलंय. एकेक सेंटीमीटर चे फोटो त्याने सुरुवातीला कट करून सुबकपणे रेखाटले. त्यानंतर बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या छटा त्यांनी एकत्रित करून हे पोट्रेट बनवले आहे. सोलापूरमध्ये स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेणाऱ्या विपूलला त्याच्या विद्यार्थ्यांनीही यामध्ये मदत केली आहे. सोलापूरकरांनी 77 वर्षांनंतरही जपल्या आहेत बाबासाहेबांच्या ‘त्या’ आठवणी, पाहा Video आंबेडकर जयंतीच्या दिवशी म्हणजेच 14 एप्रिलला रात्री बारा वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा येथे हे पोट्रेट सर्व शहरवासीयांना पाहता येणार आहे.