अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर, 9 मे : सोलापूर महापालिकेतील पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शासन आदेशानुसार महापालिकेने त्यासाठी टीसीएस कंपनी बरोबर करार केला आहे. त्यामुळे 32 संवर्गातील 340 पदांची भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे. साधारणतः तीन महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त शितल तेली - उगले यांनी दिली आहे.
340 पदे भरण्याचे आदेश
महाराष्ट्र शासनाकडून सोलापूर महापालिकेतील आवश्यक असलेली 340 पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाने मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार सोलापूर महापालिकेत एकूण 1125 पदे रिक्त आहेत. त्यापैकी ही 32 संवर्गातील 340 पदांची भरती करण्याची परवानगी शासनाने महापालिकेला दिली आहे. या पद भरतीसाठी आस्थापना खर्चाची अटही शिथिल केली आहे. सध्या महापालिकेचा आस्थापना खर्च 41 टक्के आहे. या पदभरती नंतर तो खर्च वाढून 43 टक्के पर्यंत जाणार आहे.
टीसीएस कंपनीकडून होणार पदभरती
सोलापूर महापालिकेतील 340 पदांची भरती प्रक्रिया ही शासन आदेशानुसार टीसीएस कंपनीकडून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी टीसीएस कंपनी बरोबर करार करण्यात आला आहे. त्यावर स्वाक्षरीही झाली आहे. दरम्यान, भरती प्रक्रिया संदर्भात आवश्यक विषयांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चाही करण्यात आली आहे. पदभरतीची ही परीक्षा कशा पद्धतीने होईल ? त्याची नियमावली, परीक्षेसाठीची फी, परीक्षा कधी व कशी होणार यासह विविध विषयांवर आज या मीटिंगमध्ये चर्चा झाली. सोलापूरसाठी या टीसीएस कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजरही नियुक्त करण्याचे निश्चित झाले आहे.
32 संवर्गातील 32 परीक्षा पेपर सेट करावे लागणार
32 संवर्गातील 32 परीक्षा पेपर सेट करावे लागणार आहेत. यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. त्या त्या पदासाठीच्या पात्रतेनुसार हे पेपर सेट करण्यात येणार आहेत. साधारणता: या परीक्षा प्रक्रियेच्या तयारीसाठी कंपनीला तीन महिन्याचा अवधी लागणार आहे. त्याची तयारीही कंपनीने सुरू केली आहे. त्यानंतरच ही प्रक्रिया सुरू होईल, असेही महापालिका आयुक्त शितल तेली - उगले यांनी स्पष्ट केले.

)







