अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 19 एप्रिल : राज्यात आणि देशात दरवर्षी अनाथ मुला-मुलींची संख्या वाढत जात आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षण आरोग्य तसेच मूलभूत गरजांच्या संदर्भात पूर्तता आणि त्यांची व्यवस्था करण्यामध्ये प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय त्यांच्या अनेक वैयक्तिक कागदपत्रांची पूर्तता सुद्धा करणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे अशावेळी त्यांचे संगोपन आणि शिक्षण देण्याची सर्वस्वी जबाबदारी ही अनेक मोठ्या संस्थांनी स्वीकारलेली आहे. भारतीय जैन संघटनेनेही महाराष्ट्र राज्यातील अनाथ मुला- मुलींचे मोफत संगोपन आणि शिक्षण देण्याची जबाबदारी स्विकारली आहे. किती विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश? 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी - 6 वीच्या विद्यार्थ्यांना भारतीय जैन संघटनेकडून प्रवेश देण्यात येणार आहे. इयत्ता 5 वी साठी 50 आणि इयत्ता 6 वी साठी 30 मुला-मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंतचे शिक्षण, निवास, भोजन, शिक्षण साहित्य, आरोग्य तपासणी आणि औषधे मोफत सोय वाघोली पुनर्वसन प्रकल्प येथे असणार आहे.
काय आहे अट? आई किंवा वडील यापैकी एकाचा किंवा दोघांचा मृत्यु कोविड-19 किंवा शेतकरी आत्महत्या असेल तर प्रवेश मिळेल आहे .विद्यार्थ्यांना bit.ly/BJS_WERC_Adm या लिंकवर जाऊन नाव नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी साळुंखे सर 7722018586, सविता सुतार 9860105326 यांच्याशी संपर्क साधावा. इच्छुकांनी लवकरात लवकर फार्म भरून पाठवावा, असं आवाहन भारतीय जैन संघटनेकडून करण्यात आले आहे.