सोलापूर, 2 डिसेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी असतो. या दिनानिमित्त बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी राज्य आणि देशभरातून अनेक भाविक मुंबईत येत असतात. यासाठी भाविकांचे कोणतेही हाल होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे कडून 14 विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. या सर्व 14 रेल्वे गाड्या देशभरातील 16 विभागाकडून 5 डिसेंबर रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत. यामध्ये सोलापूरमधून 2 गाड्या असतील अशी माहिती सोलापूर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांनी दिली आहे.
सोलापूर शहरासोबतच मंगळवेढा,बार्शी ,अक्कलकोट ,पंढरपूर ,मोहोळ ,माढा या तालुक्यातून भाविक मोठ्या संख्येने सोलापूर रेल्वे स्थानकावरून महापरिनिर्वाण दिनानिमीत्त मुंबईला जातात. दरवर्षी रात्री साडेदहा वाजता निघणारी सोलापूर मुंबई सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वे गाडीचे कोचेस वाढवून भाविकांची जाण्याची सोय होती. पण भाविकांची गर्दी लक्षात घेता यंदाच्या वर्षी सोलापुरातील कलबुर्गी विभागातून एका विशेष गाडीची सोय केली असल्याने भाविकांची गर्दी कमी होणार आहे. त्यामुळे यावर्षी सोलापूर मधून 2 गाड्या धावणार आहेत.
प्रवासादरम्यान भाविकांनी रेल्वेच्या दारात उभा राहून प्रवास करू नये. शिवाय प्रवासाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याचीही दक्षता रेल्वे विभागातर्फे घेण्यात येणार आहे. महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई ,पुणे याच्यानंतर सोलापुरातील सर्वात जास्त संख्येने भाविक हे मुंबईला जात असतात. यंदाच्या वर्षी मुंबईहून सोलापूरला परतीचा प्रवास हा रेल्वेने दिनांक 6 व 7 डिसेंबर या दोन्ही दिवशी भाविकांना करता येईल, असेही एल. के. रणयेवले यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.