सोलापूर, 12 जून : सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातल्या मदिना चौकाजवळ पुतण्यानेच आपल्याला काकावर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. माणसांनी गजबजलेल्या रस्त्यावर दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. मुस्ताक पटेल असे पुतण्या असलेल्या आरोपीचे नाव आहे तर मृत काकाचे नाव शकील पटेल असे आहे.
काका आणि पुतण्याच्या घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मागील अनेक दिवसांपासून काका आणि पुतण्यामध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होते. याच कारणावरून आज दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी शकील पटेल यांच्यावर भर रस्त्यात चाकुने सपासप वार करून त्यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय जगताप यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालय पाठवला आहे.
हेही वाचा - मुलीचा हात का धरला? विचारत निवृत्त जवानाला लोखंडी रॉडने मारहाण, उपचारदरम्यान मृत्यू
दरम्यान, आरोपी मुस्ताक पटेल हा स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र भर दिवसा अशा पध्दतीने खून झाल्याने सोलापूर शहारात मोठी दहशत पसरली आहे.
संपादन - अक्षय शितोळे