करमाळा, 26 एप्रिल : कोरोनाचा जीवघेणा आजार व जिल्हाबंदीचा अंमल सुरू असताना महसूल व पोलीस ठाण्याची परवानगी न घेता पुणे येथे गेल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील अंजनडोहचे पोलीस पाटील विलास शेळके यांच्याविरोधात राष्ट्रीय आपत्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल केला केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली आहे.
करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी याप्रकरणी पोलिसांत स्वतः फिर्याद दिली आहे. कोरोना आजारामुळे सर्व प्रतिनिधीना ज्या त्या नेमणुकीच्या गावात कामे दिलेली आहेत. अंजनडोह गावात भेट दिली असता पोलीस पाटील आढळून आले नाहीत. त्यांचे बंधू यांच्याकडे चौकशी केली असता पोलीस पाटील यांची मुले पुणे येथील वारजे - माळवाडी येथे शिक्षणासाठी राहत असल्याने ते मुलांना भेटण्यासाठी पुणे येथे गेले व तेथेच राहिले आहेत, असे सांगण्यात आले.
याप्रकरणी पोलीस पाटील यांच्याविरोधात आपत्ती कायद्याच्या कलम 51 ब आणि 56 तसेच भा.दं.वि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे पुढील तपास करत आहेत. मात्र पोलीस पाटलांनीच शासनाच्या आदेशाचा भंग करत जिल्हाबंदीचा आदेश धुडकावल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापुरात काय आहे कोरोनाची स्थिती?
कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्यानंतरही या धोकादायक व्हायरसपासून दूर राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात आता कोरोनाचा शिरकाव झाला असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोलापुरात काल 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या 50 वर पोहचली आहे. कोरोना पॉझिटिव्हमध्ये ग्रामीण भागातील सांगोला तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Solapur news