लॉकडाऊनच्या काळात दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले, कारवाईला सुरुवात

लॉकडाऊनच्या काळात दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले, कारवाईला सुरुवात

लॉकडाऊन काळात दारु विकणारे अडचणीत येणार आहेत.

  • Share this:

पंढरपूर, 12 जून : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन झाल्यानंतर इतर सर्व अस्थापनांसह परमिट रुम आणि बियर बार बंद ठेवण्याचा आदेश दिला गेला होता. या दुकानांना दारू विक्री करण्यास पूर्ण बंदी होती. त्यामुळे आता उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच परमिट रुम व बियर बारमध्ये असलेल्या दारू साठ्याची तपासणी सुरू केली आहे. यामुळे लॉकडाऊन काळात दारु विकणारे अडचणीत येणार आहेत.

दारु विक्रीची चौकशी करण्याची मागणी प्रहार संघटनेने केली होती. लॉकडाऊन काळातच पंढरपूरमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी ठिय्या मांडून राहात असलेल्या एका परमिट रुम, लॉजमधील रुमवर पोलिसांकडून छापा टाकून दारू साठा जप्त करण्यात आला होता. यावरून या अवैध दारू विक्रीमध्ये अनेक जणांचे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनाला आता अडीच महिने पूर्ण होत असून या काळात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व बियर बार तसेच परमिट रुम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सवयीचे गुलाम असणाऱ्या तळीरामांची सोय म्हणून काही वाईन शॉप व परमीट रुम वाल्यांनी चढया किमतीने विनापरवाना दारु विक्री केली असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला होता.त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लॉकडाऊन केले तेव्हा असलेला व आज रोजी असलेला दारु साठयाची पडताळणी सुरू केली असून यामुळे ज्यांनी लॉकडाऊनच्या काळात विनापरवाना दारु विक्री केली आहे अशा परमिट रुम चालकांचे दाबे दणाणले आहेत.

सोलापूर शहर व ग्रामीण भागातील सर्व परमिट रुम,वाईन शॉप व बियर बारमधील स्टॅाकची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत दोन वाईन शॉप व सहा परमिट रुमची तपासणी पूर्ण झालेली आहे. आमच्याकडे कर्मचारी कमी असून आमचा एक कर्मचारी कोरोना संक्रमित आढळल्याने आमची तपासणी मोहीम थंडावली आहे. दोन दिवसात या बाबतची कारवाई समोर येईल, असे उत्पादन शुल्क अधिकारी किरण बिराजदार यांनी सांगितले आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 12, 2020, 3:35 PM IST

ताज्या बातम्या