पालघर, 02 फेब्रुवारी: पालघरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील पाच शिक्षकांना शाळेत जीन्स घालून गेल्याप्रकरणी शिक्षण विभागाने त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. पाचही शिक्षकांना शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एका सरकारी शाळेतील आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी अध्यादेश जारी केला होता. या आदेशात म्हटलं होतं की, सरकारी शाळेत शिक्षकी पदावर काम करणाऱ्या लोकांनी सुटसुटीत आणि सभ्य कपडे परिधान करावेत. या निर्णयाचा अनेक स्तरांतून विरोध झाला होता. या नोटीसनुसार, संबंधित शिक्षकांना दोन दिवसांच्या आत आपलं उत्तर घेवून कार्यालयात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारणे दाखवा नोटीसचं वेळेत उत्तर दिलं नाही, तर पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला आहे. शिवाय सरकारने आदेश काढल्यानंतरही त्या आदेशाचं पालन का करण्यात आलं नाही? असा प्रश्नही या नोटीसमध्ये विचारण्यात आला आहे. सरकारी शिक्षकांच्या या गणवेशावरून अगोदरच वाद निर्माण झाल्यानंतर या प्रकरणामुळे वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. काय आहेत नियम? शिक्षकांनी गडद, रंगीबेरंगी आणि नक्षीदार कपडे घालू नयेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात आणि शिक्षकांनी शाळेत जीन्स किंवा टी-शर्ट घालू नये. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालावेत. महिलांनी साड्या, सलवार, कुर्ता, शर्ट घालावा. महिला कर्मचार्यांनी चप्पल, सॅंडल, शूज परिधान करावेत. पुरुष कर्मचाऱ्यांनी सामान्य शूज किंवा सॅंडल घालावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







