वाशिम, 8 जुलै : शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांची लोकसभेतील पक्ष प्रतोदपदावरून हकालपट्टी करण्यात आली. या निर्णयाविरोधात गवळी समर्थक शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात आलं. भावना गवळी यांचं मुळ गाव असलेल्या रिसोडमध्ये शिवसैनिकांकडून निदर्शनं करण्यात आली. भावना गवळी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी, अनथ्या आमच्या पदांचे राजीनामे मंजूर करावेत, असा अल्टिमेटमच या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला आहे. शिवसेना संसदीय नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं. या पत्रात भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटवण्याची मागणी केली. राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेना रिसोड तालुकाप्रमुख महादेव ठाकरे, रिसोड शहर प्रमुख अरुण मगर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप मोरे, युवा सेना तालुकाप्रमुख गजानन अवताडे, महिला आघाडी प्रमुख संध्या सरनाईक,अतुल पवार,अनिताताई इंगळे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी खासदार भावना गवळी यांच्या समर्थनार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. यापुढे आम्ही शिवसेना पक्षात शिवसैनिक म्हणून काम करू. जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीमध्ये आम्हाला कुठेही शिवसेना पक्षाची मदत झालेली नाही. आमच्याकडे शिवसेना नेत्यांनी लक्ष सुद्धा दिले नाही, असं शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. शिवसेना खासदार राजन विचारे (Rajan Vichare) हे शिवसेनेचे लोकसभेतील नवे प्रतोद असतील. मुख्य म्हणजे राजन विचारे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या मतदारसंघातूनच लोकसभेमध्ये निवडून गेले आहेत. शिवसेनेने संसदेचं पावसाळी अधिवेशन आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर असताना भावना गवळी यांची प्रतोदपदावरून हकालपट्टी केली आहे, त्यामुळे भावना गवळीही बंडाच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.