शरद पवारांवरील 'ईडी'च्या कारवाईवर शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांवरील 'ईडी'च्या कारवाईवर शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावरील कारवाईबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ने (सक्तवसुली संचलनालय)राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईडीने केलेल्या या कारवाईमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावरील कारवाईबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे.

'ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईबद्दल मला माहिती नाही. तो विषय केंद्राशी संबधित असल्याने मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने जर निर्देश दिले असतील तर आपण त्याकडे तसं पाहिलं पाहिजे,' असं म्हणत शिवेंद्रराजे यांनी याप्रकरणी थेट भूमिका घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं आहे.

'फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या...'

शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगलं खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसंच हे ED चं प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगलं खेळता येत नसलं की काहीही करून चिडायचं. फक्त एक गोष्ट लक्षात असूद्या... आपला गडी लई भारी आहे,' असा विश्वास रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

महाराष्ट्रभरात राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका

शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हे दाखल केल्यानंतर शरद पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादीने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे.

शरद पवार यांच्या फोटोसह 'आय सपोर्ट शरद पवार' असा मजकूर राष्ट्रवादीकडून व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राष्ट्रवादी रान पेटवण्याची चिन्ह आहेत.

VIDEO : शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं आश्चर्य, म्हणाले...

Published by: Akshay Shitole
First published: September 25, 2019, 12:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading