शिर्डी, 5 डिसेंबर : शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनाला भाविकांनी भारतीय पोषाखात यावे असं आवाहन साई संस्थानने केलं आहे. तसे फलकही साई मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. त्यानंतर यावरून मोठा वाद निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी 10 डिसेंबर रोजी शिर्डीत येऊन ते फलक हटवू असा इशारा दिला असून त्यानंतर आता ब्राम्हण महासंघ आक्रमक झाला आहे. ब्राम्हण महासंघाने संस्थानच्या निर्णयाचे स्वागत करत आज शिर्डीत येऊन सदर फलकाला पुष्पहार घालून पूजन केलं आहे.
'तृप्ती देसाई या फक्त सवंग प्रसिद्धीसाठी असे स्टंट करत आहेत. त्यांना फलकाला हात लावू देणार नाही आणि शिर्डीतही पाय ठेवू देणार नाही,' असा इशारा ब्राम्हण महासंघाने दिला आहे. भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालण्याचे संस्थानने केलेले आवाहन योग्य असून तृप्ती देसाई यांनी कायदा हातात घेऊ नये, अन्यथा आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशारा ब्राम्हण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला आहे.
संस्थानने आवाहन नव्हे तर आग्रही भूमिका घ्यावी आणि नियमांचे पालन न करणाऱ्या भाविकांना सक्ती करावी. अशा व्यक्तीना संस्थानने बाहेर काढावे, अशी मागणी देखील ब्राम्हण महासंघाने केली आहे. तृप्ती देसाई फलकापर्यंत काय तर त्यांना शिर्डीतही पोहोचू देणार नाही असे थेट आव्हान आनंद दवे यांनी दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.