हरीद्वार, 19 एप्रिल : हरिद्वार (Haridwar) येथे तीर्थयात्रेकरिता राज्यातून गेलेल्या तब्बल 70 यात्रेकरूंना राज्य सरकार परत आणणार की नाही, असा सवाल यात्रेकरुंचे कुटुंबीय विचारत आहे. तीर्थ यात्रेला गेलेले अधिकतर वयस्कर असल्याने तेथे त्यांचे हाल होत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अशावेळी तेथील कोणा यात्रेकरुला काही झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
20 मार्च रोजी हे यात्रेकरू हरिद्वार येथे पोहोचले. मात्र त्यातच देशात वाढणाऱ्या कोरोनाच्या (Covid - 19) रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आले. यामुळे अनेक यात्रेकरू तेथेच अडकून पडले आहेत. बाबामहन दास धाम, दुधारी चौक, भूपटवाला, हरिद्वार येथे सर्व यात्रेकरू अडकून पडले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत इतर राज्यातील यात्रेकरू होते. त्या त्या राज्याने विशेष व्यवस्था करुन यात्रेकरुना सुखरूप घरी पोहोचलवे. अगदी सांगली येथील स्थानिक प्रशासनाने सोय करून दिल्यामुळे ते घरी जाऊ शकले आहेत. मात्र डोंबिवली व सोलापूर या भागातील अनेकजण हरिद्वार येथे अडकून पडले आहेत. मात्र राज्य सरकार त्यांना आणण्याचा प्रयत्न करीत नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कारवाई करीत हरिद्वार येथे अडकलेल्यांना घरी सुखरुप पोहोचवावे अशी मागणी केली जात आहे.
देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. सध्या मुंबईतच कोरोनाची रुग्णसंख्या 2000 च्या पार गेली आहे. त्यात राज्यातील रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे संकट पाहता मे महिन्याच्या 3 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मात्र अद्यापही वाहतूक व्यवस्था केव्हापासून सुरू करणार याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाही. त्यामुळे हरिद्वार येथे अडकलेले आपले नातेवाईक कधीपर्यंत घरी परतणार याबाबत साशंकता असल्याने कुटुंबीयांच्या मनात मोठी धाकधूक आहे.