01 ऑक्टोबर : राज्यात गेल्या चार महिन्यांत पावसाने समाधानकारक कामगिरी केली आहे. मात्र हा पाऊस सर्वत्र सारख्या प्रमाणात पडलेला नसून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १४ टक्के अधिक तर विदर्भात सरासरीच्या २३ टक्के कमी पाऊस पडला आहे. देशभरात सरासरीच्या ९५ ते ९६ टक्के पाऊस झाला असून, मोसमी वाऱ्यांनी आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मोसमी वाऱ्यांनी राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असली तरी दक्षिण भारतात मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. मात्र, तांत्रिकदृष्ट्या १ जून ते ३० सप्टेंबर हा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पावसाचा काळ समजला जातो. जागतिक हवामानाची मे महिन्यातील स्थिती लक्षात घेऊन केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने पावसाच्या चार महिन्यांत महाराष्ट्राचा समावेश असलेल्या मध्य भारतात पाऊस १०० टक्के कामगिरी करेल, असा अंदाज जूनच्या पहिल्या आठवड्यात वर्तवला होता. महाराष्ट्रात पावसाने सरासरीएवढीच कामगिरी केली आहे. राज्यात दरवर्षी सरासरी १००७.३ मिलीमीटर पाऊस पडतो. या वेळी ३० सप्टेंबपर्यंत १००६.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोकणात सरासरीच्या १० टक्के अधिक, मध्य महाराष्ट्रात १७ टक्के अधिक तर मराठवाड्यात व विदर्भात तब्बल २३ टक्के कमी पाऊस पडला. विदर्भातील नागपूर वगळता इतर सर्व जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया येथे ७० टक्केही पाऊस झाला नाही. मराठवाड्यात परभणी, हिंगोली व नांदेड येथे ७० ते ८० टक्के पाऊस पडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







