सातारा, 22 ऑक्टोबर : शेतकऱ्यांसमोर एका मागून एक संकटे येत आहेत. परतीच्या मुसळधार पावसाने उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यांतील 1100 हून अधिक हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसला. यामध्ये 100 पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. दरम्यान, पीक नुकसानीचे पंचनाम्याचे सुरू असले तरी ते काम धिम्या गतीने सुरू आहे. लवकरात लवकर पंचनामे करून शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सरासरीच्या अधिक पावसाची नोंद होत आहे. यावर्षीही सप्टेंबर अखेर जिल्ह्यात अधिक पाऊस झाला. तर ऑक्टोबर सुरू झाल्यापासून परतीचा पाऊस तडाखा देत आहे. सलग 10 ते 12 दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. यामध्ये जीवित तसेच वित्तहानीही झाली आहे. झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून गेले आहे.
निसर्गाची अवकृपा
जुलै महिन्यापासून शेतकऱ्यांना दोन वेळा अतिवृष्टीचा तडाखा सहन करावा लागला आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक काढणीच्या शेवटच्या टप्प्यात असतानाच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसात कोरेगाव, खटाव, खंडाळा, महाबळेश्वर, कऱ्हाड आणि वाई तालुक्यातील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
Satara : ट्रेकर्सना दिवाळी गिफ्ट! दुर्गप्रेमींचा आवडता किल्ला 'सर' करण्याचा मार्ग मोकळा, Video
कोणत्या तालुक्यात किती नुकसान?
जिल्ह्यात एकूण 1128 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज आहे. तर सर्वाधिक फटका खंडाळा तालुक्यातील पिकांना बसला आहे. या तालुक्यात बाधित क्षेत्र 405 हेक्टर आहे. तर खटावला 326, वाई तालुका 163, कोरेगाव 120, महाबळेश्वरमधील अंदाजे 92 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. परतीच्या पावसात विविध पिके बाधित झाली आहेत. यामध्ये ऊस, घेवडा, सोयाबीन, स्ट्रॉबेरी, भाजीपाला, भुईमूग, वाटाणा, केळी, बटाटा, कांदा, मूग, उडीद, आले आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर नुकसानग्रस्त गावांची संख्या सर्वाधिक खटाव तालुक्यात 42 आहे. तर यानंतर वाई तालुक्यात 31, कोरेगाव 18, महाबळेश्वर 14, कन्हाड 4 आणि खंडाळा तालुक्यात 3 गावांचा समावेश आहे.
आठ दिवसात पंचनामे पूर्ण होतील
जिल्ह्यात परतीच्या पावसाने आत्तापर्यंत अंदाजे 1100 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झालेले आहे. आठ दिवसात पंचनामे पूर्ण होऊन जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Satara, Satara news