ठाणे, 21 फेब्रुवारी : आपल्या जीवाला धोका असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांनी एका गुंडाला सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रही लिहिलं आहे. ‘ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे’, असं संजय राऊत फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत. हे पत्र आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही पाठवल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
@Dev_Fadnavis pic.twitter.com/TJ8Vqa5Vb8
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 21, 2023
राजा ठाकूर समोर दरम्यान संजय राऊत यांनी आरोप केलेल्या राजा ठाकूर यांच्याशी नेटवर्क 18 ने संपर्क केला, तेव्हा त्यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावले. याचसोबत त्यांनी संजय राऊत यांच्यावरही पलटवार केला आहे. ‘संजय राऊत यांच्या स्वप्नात पण असं दिसत असेल तर याला आपण काय करणार?,’ असं राजा ठाकूर म्हणाले. संजय राऊत तुम्हाला सुपारी दिली असल्याचं म्हणत आहेत, असा प्रश्न ठाकूरना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी राऊत लहान माणूस आहे का? त्याला हे बोलणं शोभतं का? असं उत्तर दिलं. तुमची आणि श्रीकांत शिंदे यांची भेट झाली होती का? असा प्रश्नही राजा ठाकूरना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी श्रीकांत शिंदे आमच्या मतदारसंघाचे खासदार आहेत. शिवसेनेचं नाव गेल्यापासून ते सगळ्यांवर आरोपच करत आहेत. त्यांची लोक त्यांना सोडून गेली तेव्हापासून त्यांचं कामच आरोप करायचा आणि प्रसिद्धी मिळवायची, अशी टीका ठाकूर यांनी केली.
‘माझ्या इज्जतीची वाट लावत आहेत, मला गुंड बोलणारे हे कोण आहेत?’ असा प्रश्नही ठाकूर यांनी विचारला आहे. तुमच्यावर खंडणी, मर्डर, हाफमर्डरच्या केसेस आहेत का? असा प्रश्नही ठाकूरना विचारण्यात आला. तेव्हा मी जामिनावर आहे, कोर्टाने मला निर्दोष मुक्तता दिली आहे, असं उत्तर राजा ठाकूरनी दिलं.