मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भर रस्त्यात बोकडाचा बळी अन् अघोरी साहित्य, घाबरलेली महिला बेशुद्ध, सांगलीमध्ये खळबळ

भर रस्त्यात बोकडाचा बळी अन् अघोरी साहित्य, घाबरलेली महिला बेशुद्ध, सांगलीमध्ये खळबळ

बोकड रस्त्यात कापलं, अघोरी साहित्यही ठेवलं, सांगलीतली खळबळजनक घटना

बोकड रस्त्यात कापलं, अघोरी साहित्यही ठेवलं, सांगलीतली खळबळजनक घटना

पुरोगामी सांगली जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना विट्यामध्ये घडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. बोकडाचा बळी देऊन रस्त्यातच अघोरी साहित्य फेकण्यात आलं आहे.

आसिफ मुरसळ, प्रतिनिधी

सांगली, 18 मे : पुरोगामी सांगली जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना विट्यामध्ये घडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. भर रस्त्यात बोकडाचा बळी देऊन मुंडके आणि दोन पाय, नारळ, रोट्या, काजळ, पावडर, लिंबू, दारूची बाटली असले साहित्य सांगलीच्या विटा-कराड राष्ट्रीय महामार्गावर सापडलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी होत आहे.

विटा ते कराड राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती चौकापासून साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर श्वेता स्टील हे फर्निचरचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एक चार चाकी गाडी आली, त्यातून दोन व्यक्ती खाली उतरले. एकाच्या हातात बोकडाचे पिल्लू (कोकरू) होते आणि त्यांनी त्या पिल्लाला खाली पाडून तिथेच त्याच्या मानेवर सूरी फिरवली. त्यावर त्याचे मुंडके आणि गुडघ्यापासून खालचे पुढचे दोन पाय धडा वेगळे केले आणि एका वर्तमान पत्राच्या कागदावर नारळ, रोट्या, तांदूळ, औषधाच्या गोळ्या, एक अंडं, काजळ, पावडर, लिंबू, दारूची बाटली असले साहित्य ठेवले, आणि त्या व्यक्ती पसार झाल्या.

ही घटना इतक्या विद्युत वेगाने घडली की शेजारी भांडी घासणार्‍या एका महिलेला दिसली, तशी ती महिला जोरात ओरडून अक्षरशः गांगरून गेली आणि जागीच बेशुद्ध पडली. घरातील अन्य व्यक्तींनी तिला उठवून विचारले असता तिने समोर पाहिलेले दृश्य सांगितले. त्यावेळी एखाद्या लहानग्याचा नरबळी दिला की काय? अशी भीती त्या घरातील लोकांना वाटली. ग्रामस्थांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच पोलिसांना बोलावले, त्यानंतर हा सर्व प्रकार पोलिसांच्याही निदर्शनास आला.

विटा शहरात भर रस्त्यावर बोकड बळी देणाऱ्या व्यक्तीवर आणि असे अघोरी कृत्य करण्याचा सल्ला देणाऱ्या मांत्रिकावर विटा पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात, वाघेश साळुंखे यांनी केली आहे.

First published:
top videos