सांगली, 22 डिसेंबर : सांगलीच्या चुडेखिंडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भानामती करणीचे प्रकार घडला होता, मात्र तरी देखील विरोधी उमेदवार विजय झाला आहे, यानंतर विजयी उमेदवाराने जाहीररीत्या एक-दोन नव्हे तर तब्बल 3 हजार लिंबू आणि त्यावर गुलाल उधळत त्यावरून विजयी मिरवणूक काढली. दरम्यान हा प्रकार लिंबूचा उतारा असल्याची गावात चर्चा सुरू आहे. मात्र नव्या सरपंचांनी विरोधकांनी केलेल्या भानामतीची निषेध आणि अंधश्रद्धा पायदळी तुडवण्यासाठी लिंबू चिरडल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. सांगली कवठेमहांकाळ तालुक्यातल्या चुडेखिंडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गावात मंतरलेले लिंबू पुरत भानामतीचा प्रकार घडला होता. सत्ताधाऱ्यांनी विरोधी उमेदवाराचा पराभव करण्यासाठी हा प्रकार केल्याची गावभर चर्चा होती. आता सत्ताधारी उमेदवाराला सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत केल्यानंतर विजयी झालेल्या सरपंचपदाच्या उमेदवाराने भानामतीच्या विरोधात थेट लिंबांची रस्त्यावर उधळण केली आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 3 हजार लिंबं सरपंचाने रस्त्यावर फेकली. या लिंबांवर गुलाल टाकून त्यावरून गाडी फिरवून लिंब चिरडण्यात आलं. या लिंबांवर गाड्या चालवून लिंबू चिरडुन टाकले आहेत. तर या प्रकारामुळे विरोधकांच्या भानामतीला हा लिंबूंचा उतारा दिल्याची गावात चर्चा सुरू झाली आहे. निवडून आलेले सरपंच बाबुराव पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘विरोधकांनी गावामध्ये भानामतीचा प्रकार केला होता. गावातल्या मतदान केंद्राच्या बूथ समोर लिंबू आणि नारळ पुरले होते, त्यामुळे गावात एक भीतीच वातावरण निर्माण झालं होतं, मात्र निवडणुकीमध्ये हा भानामतीचा प्रकार चालत नाही. हे चुडेखंडीच्या गावांनी दाखवून दिलेला आहे, त्यामुळे पूरलेल्या लिंबूंचा निषेध म्हणून आम्ही रस्त्यावर लिंबू फेकून ते चिरडून टाकलं. अंधश्रद्धेला बळी पडू नका, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. हा कोणत्याही प्रकारचा लिंबूचा उतारा आणि अंधश्रद्धा नाही,’ असं बाबुराव पाटील म्हणाले. निवडणुकीत घडलेल्या या प्रकाराबाबत अंनिसकडून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.