असिफ मुरसल, सांगली, 09 एप्रिल : आयपीएलची रंगत आता वाढायला लागली असून शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत झाली. आय़पीएलमधला हा १ हजारावा सामना होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षातही टशन बघायला मिळते. आता शनिवारी चेन्नईच्या विजयानंतर सांगलीतील इस्लामपूर इथं धोनीच्या चाहत्यांनी त्याच्या पोस्टरला दुग्धाभिषेक केला. इस्लामपूरच्या पाटील गल्लीत मुंबई इंडियन्स आणि सुपर चेन्नई सुपर किंग्स दोन्ही टीमचे मोठे चाहते आहेत. सामन्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून पाटील गल्लीत आप-आपल्या संघाचे फलक आमने-सामने लावण्यात आले होते. एकाच गल्लीत दोन संघांच्या फॅन्समुळे सामन्यानंतर सर्वांनाच टेन्शन आलं होतं. मात्र सामना झाल्यानंतर मैत्रीपूर्ण पद्धतीने चाहत्यांनी जल्लोष केला.
सांगलीतील इस्लामपूरमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर महेंद्र सिंह धोनीच्या पोस्टरला दुधाने अभिषेक#CSK #MI #MSdhoni #Cricket #IPL2023 pic.twitter.com/tqXqopHYVP
— News18Lokmat (@News18lokmat) April 9, 2023
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत एका पाठोपाठ एक मुंबईच्या फलंदाजांना तंबूत धाडले. मुंबईला २० षटकात ८ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईकडून इशान किशनने ३२, टीम डेविडने ३१ आणि रोहित शर्मा यांनी २१ धावा केल्या. चेन्नईकडून जडेजाने ३ तर तुषार देशपांडे आणि मिशेल सँटनरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मुंबईने दिलेलं १५८ धावांचं आव्हान चेन्नईने १८.१ षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.अजिंक्य रहाणेच्या वादळी अर्धशतकाच्या आणि ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे यांच्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने १२ चेंडू आणि ७ गडी राखून विजय मिळवला. मुंबईला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवून चेन्नई जिंकली. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील हा सलग दुसरा पराभव आहे.