धावपटू ललिता बाबर यांच्याकडे नवी जबाबदारी, रायगड जिल्ह्यात प्रभारी तहसीलदार म्हणून नेमणूक

धावपटू ललिता बाबर यांच्याकडे नवी जबाबदारी, रायगड जिल्ह्यात प्रभारी तहसीलदार म्हणून नेमणूक

ललिता बाबर यांची प्रभारी तहसीलदार पदावर माणगाव येथे नेमणूक झाली आहे.

  • Share this:

रायगड, 27 नोव्हेंबर : भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची प्रभारी तहसीलदार पदावर माणगाव येथे नेमणूक झाली आहे. खेळाडू कोट्यातून तहसीलदारपदी त्यांची सरकारने नियुक्ती केली आहे. आज त्यांनी पदभार स्वीकारला. ललिता बाबर या राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहेत.

ग्रामीण भागातील ललिता बाबर यांनी अत्यंत संघर्ष करत यशासाठी उत्तुंग झेप घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील माण परिसरात असलेल्या मोही या लहान खेडेगावात ललिता बाबर यांचा जन्म झाला. जागतिक स्तरावर पी. टी. उषा व कविता यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेल्या खेळाडू अशी ललिता बाबर यांची ओळख आहे.

शेतमजूर कुटुंबातून असताना त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविलं आहे. त्या जिल्हा स्तरावरील शालेय मैदानी स्पर्धांमध्ये नेहमीच स्पर्धा जिंकत आलेल्या आहेत. बाबर यांनी मध्यम व लांब अंतराच्या धावण्याच्या शर्यतींमध्ये सातत्यपूर्ण यश मिळविले. त्यानंतर त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला.

क्रीडा व अर्जुन पुरस्काराने सन्मानित

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीने (फिक्कीने) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने 2015 साली क्रीडा पुरस्कार प्रदान करताना बाबर यांना 'स्पोर्ट्‌स पर्सन ऑफ दी ईयर' असे म्हटले होते. त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू माणगावला तहसीलदार म्हणून लाभल्याने माणगावचे नाव उंचावले आहे. माणगांवकरांकडून नवनियुक्त प्रभारी तहसीलदार यांचे अभिनंदन व स्वागत होत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 27, 2020, 9:31 PM IST
Tags: raigad

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading