मुंबई, 17 ऑगस्ट : भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाणार असल्याचा आरोप केला. तसंच सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणीही कंबोज यांनी केली. मोहित कंबोज यांनी या ट्वीटवरून अप्रत्यक्षपणे अजित पवारांचं (Ajit Pawar) नाव घेतलं का? अशी चर्चाही सुरू झाली. मोहित कंबोज यांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पलटवार केला आहे. ‘ओव्हरसीज बँकेत 52 कोटींचा घोटाळा आणि पीएनबी बँकेच्या घोटाळ्यात नाव आलेल्या मोहित कंबोज यांच्याबद्दलच तुम्ही मला विचारलं आहे ना. मी अजून त्यांना कधी भेटलेलो नाही, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव ऐकलं आहे. प्रसिद्धी माध्यमांमध्ये येण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते,’ असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. ‘आतापर्यंत किरीट सोमय्या विरोधी पक्षांवर आरोप करायचे, पत्रकार परिषद घ्यायचे, ट्वीट करायचे, यातून त्यांना कव्हरेज मिळायचं. आपल्यालाही असंच कव्हरेज मिळावं म्हणून कंबोज असं करत असावेत,’ असं वक्तव्यही रोहित पवार यांनी केलं आहे. ‘सागर’वर मोठ्या घडामोडी, मोहित कंबोज-रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीला काय म्हणाले मोहित कंबोज? राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटेल, असं ट्वीट कंबोज यांनी केलं होतं. तसंच सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी व्हावी, ज्याची फाईल परमबिर सिंग यांनी 2019 साली बंद केली होती, असंही कंबोज म्हणाले. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत या नावांनंतर पाचव्या नावाच्या ठिकाणी कंबोज यांनी गाळलेली जागा ठेवली होती. आपला स्ट्राईक रेट 100 टक्के असल्याचंही ते या ट्वीटमध्ये म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.