हरीश दिमोटे, अहमदनगर, 10 जुलै : पावसाळा सुरु झाला की निसर्गप्रेमींची पावलं आपोआप पर्यटनस्थळांकडे वळतात. महाराष्ट्राचे ऐव्हरेस्ट म्हणून ओळख असलेल्या कळसुबाई शिखराच्या परिसरातही पर्यटकांनी मोठी गर्दी पावसाळ्यात पाहायला मिळत. मात्र निसर्ग कधी त्याचं रुप बदलेल सांगता येत नाही. याचीच प्रचिती काही पर्यटकांना कळसुबाईच्या पायथ्याशी आली. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो पर्यटक अडकले होते. राजूर पोलीस आणि काही स्थानिक युवकांनी पर्यटकांची जीव धोक्यात घालून सुखरुप सुटका केली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि कळसुबाई शिखराच्या परिसरात शनिवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. कळसुबाई शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने संपूर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला मिळते. यामुळे कृष्णवंती नदीला पूर आला होता. शनिवारी शेकडो पर्यटक शिखर सर करण्यासाठी निघाले मात्र जोरदार पाऊस सुरू झाल्याने त्यांना माघारी फिरावे लागले.
'कळसुबाई'च्या पायथ्याशी पुरामुळे शेकडो पर्यटक अडकले होते. #Rain #Kalsubai #Flood pic.twitter.com/T5quOTyzyp
— News18Lokmat (@News18lokmat) July 10, 2022
सकाळी 9 वाजल्यापासून हे सर्व पर्यटक गडाच्या पायथ्याशी रस्त्यावर सात ते आठ फुट पाणी असल्याने अडकून पडले होते. गिर्यारोहकांनी पोलिसांना संपर्क केल्यानंतर तातडीने राजूरचे पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर दाखल झाले आणि ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या शेकडो पर्यटकांना पर्यायी दुसऱ्या रस्त्याने सुखरूप बाहेर काढले. गावकरी आणि पोलिसांनी दोरीच्या सहाय्याने नदीच्या पलिकडे अडकलेल्या पर्यटकांना एका केटीवेअरवरून बाहेर काढले संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.