रत्नागिरी, 14 डिसेंबर : एसटी महामंडळाच्या मोडकळीस आलेल्या बसेस तुम्ही देखील अनेकदा पाहिल्या असतील. कुठे पत्रा तुटलेला तर कुठे खिडकीच्या काचा निखळलेल्या. मात्र, आज समोर आलेला व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची किती वाईट परिस्थिती आहे, याचा जीवंत पुरावाच हा व्हिडीओ देत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आगारातील एसटी बसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांच्या जीवाशी निगडित असलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे प्रकार?
एसटी बसच्या एक्सीलेटरला चक्क रबर बांधून खेड ते पुणे एवढे अंतर जाणाऱ्या खेड ताम्हणी मार्गे पुणे या एसटी (क्रमांक एम एच 24 बीटी. 3002) बसला दुपारी पावणे चार वाजता पाठवण्यात आले होते. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटाच्या तीव्र उतारामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता अचानक एक्सीलेटरला लावलेले रबर तुटले. चालकाने प्रसंगावधान राखून तीव्र उतार असताना देखील एसटी बस महामार्गाच्या बाजूला उभी केली. बसमधील 40 हून अधिक प्रवासी जीव मुठीत घेऊन घाबरले होते. संबंधित एसटी बस चालकाला प्रवाशांनी विचारले असता बसच्या एक्सीलेटरला बांधलेला रबर तुटल्याचं कारण सांगितले. तो बांधून पुन्हा एसटी पुढील डेपोपर्यंत गेल्यानंतर तेथील मेकॅनिकला दाखवून पुढील प्रवास होईल असे सांगण्यात आले.
Video : खेड-पुणे एसटी बसच्या एक्सीलेटरला रबरचा आधार..#stbus @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks pic.twitter.com/734lAvKeGM
— News18Lokmat (@News18lokmat) December 14, 2022
वास्तविक पाहता एसटी बसचे ब्रेक, एक्सीलेटर आणि क्लच हे सुस्थितीत पाहिजेत. मात्र, एक्सीलेटर बिघडल्यामुळे त्याला रबरचा आधार देऊन साडेतीनशे ते चारशे किलोमीटरचा प्रवास तोही घाटातून करावा लागतोय. हा प्रवाशांच्या जीवाशी एक प्रकारचा खेळच असून बसमधील अनेक प्रवाशांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावर आता प्रशासन काय भूमिका घेतय हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: St bus, St bus accident