शिवाजी गोरे, प्रतिनिधी रत्नागिरी, 22 जुलै : उशिरा आगमन झालेल्या मान्सूनने कोकणात धुमाकूळ घातला आहे. रायगडनंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. कित्येक गावांचा तालुक्याशी संपर्त तुटला आहे. पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आता समोर येत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने पुराच्या पाण्यात झाडाच्या फांदीवर बसून अख्खी रात्र जागून काढली. काय आहे घटना? रत्नागिरी जिल्ह्यातील मांदिवली चिंचघर भारजा नदीला आलेल्या पुरात महेंद्र पत्रत नामक व्यक्ती गुरुवारी रात्री वाहुन गेली होती. नदीला खूप मोठा प्रवाह असताना सुदैवाने त्याच्या हाताला फांदी सापडली. त्याला पकडुन ते झाडावर चडले. अख्खी रात्री या झाडावर बसून काढली. या नदीत मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, त्याही परिस्थितीत त्यांनी झाडाचा आसरा घेत आपले प्राण वाचवले. सकाळी गावातील लोकांनी त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले.
#Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातून काळजाचा थरकार उडवणारा व्हिडीओ pic.twitter.com/Xz34xFXySx
— News18Lokmat (@News18lokmat) July 22, 2023
पुढील चार दिवस रत्नागिरीत जोरदार पाऊस भारतीय हवामान खात्याने 21 ते 25 जुलै दरम्यान जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असल्याने व खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. वाचा - इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक रिपोर्ट समोर! तब्बल 28 गावं अन् 44 वाड्या डेंजर झोनमध्ये अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी सुटीचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. 21) शाळांना सुटी देण्यात आली होती, त्यात शनिवारी सुटी दिल्याने रविवारपर्यंत सलग तीन दिवस शाळा बंद असणार आहेत. रघुवीर घाट 31 जुलैपर्यंत पर्यटनासाठी बंद हवामान खात्याने कोकणाला जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातले मुख्य पर्यटन क्षेत्र असलेल्या व रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड मधील रघुवीर घाट 31 जुलैपर्यंत पर्यटनासाठी बंद केला आहे, या घाटात पावसाळ्यात वर्षा सहलीसाठी शेकडो पर्यटक येत असतात. मात्र, याच वर्षी गेल्या आठवड्यात या घाटात काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तसेच या घाटात पर्यटनासाठी गेलेल्या एका तरुणाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची देखील घटना घडली. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने हा घाट 31 जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे.