रत्नागिरी, 27 नोव्हेंबर : दापोली शहरातील मेहता पेट्रोल पंपावर खाजगी बसला आग लागली. यामध्ये होरपळल्याने पंपावरील कर्मचारी राजू भुवड हे गंभीर जखमी झाले आहेत.
मेहता पेट्रोल पंपवर बसला अचानक आग लागली, मात्र जी बी मेहता पेट्रोल पंप मालक आशिष मेहता, प्रसाद मेहता यांनी प्रसंगावधान राखत पेटती बस पेट्रोल पंपाच्या बाहेर नेल्याने मोठा अनर्थ टळला. तसंच तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आलं.
पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या बसने पेट घेतला. गाडी पेट घेताच आपला जीव वाचवण्यासाठी पेट्रोल पंपावरील कर्मचारी सैरभैर झाले. तसेच परिसरातील वाहने इतरत्र हलविण्यात आली. परंतु गाडीने उग्र पेट घेण्याआधीच आशिष मेहता, प्रसाद मेहता या दोन बंधूंनी मोठ्या हिमतीने पेटलेली गाडी पंपाच्या बाहेर काढली व तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र क्षणाचाही विलंब झाला असता तर पेट्रोल पंप आणि आजूबाजूच्या वस्तीला मोठा धोका निर्माण झाला असता.
पेट्रोल पंपावर पेट्रोलने भरलेला टँकर उभा होता, तसंच पेट्रोल-डिझेलने भरलेल्या दोन्ही टाक्या पूर्ण भरलेल्या होत्या. परंतु जी बी मेहता पेट्रोल पंपाचे मालक आशिष मेहता व प्रसाद मेहता या दोन्ही बंधूंनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत मोठ्या शिताफीने ही गाडी बाहेर काढून लोकांच्या जीविताला असलेला धोका टाळला आहे. या दोन बंधूंनी केलेल्या धाडसी कृत्यामुळे आज बाका प्रसंग टळला आहे. तसेच प्रसंगावधान राखत सुजय मेहता, ऋषी मालू यांनी फायर बॉलच्या सहायाने पेटता पेटता पंप विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
दापोली नगरपंचायतीचे नगरसेवक मंगेश राजपूरकर यांनी मोठ्या धाडसाने पेटत्या बसच्या खाली जाऊन गाडीचे नट ओपन केले. त्यामुळे गाडी पुढे हलविण्यात मदत झाली. नगरसेवक मंगेश राजपूरकर यांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर अमोल भुवड , मयूर मोहिते या तरुणांनीही गाडी विझवण्यात मदत केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ratnagiri, Ratnagiri police