दापोली, 18 डिसेंबर : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी शुक्रवारी (18 डिसेंबर) दुपारी तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पुणे औंध येथील 14 मित्र दापोली पर्यटनाकरिता आले होते. हे सर्वजण पुण्यातील स्ट्रेन ट्रॅक या कंपनीत कामाला होते. पर्यटनासाठी आलेले सर्व मित्र दापोली तालुक्यातील मुर्डी येथील एका रिसॉर्टमध्ये उतरले. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता दापोलीत आल्यानंतर चहा-नाश्ता घेऊन ते सर्वजण आंजर्ले येथील समुद्रात पाहण्याकरिता गेले.
समुद्रात गेल्यानंतर या मित्रांपैकी सहा जण बुडू लागले. ही बाब किनाऱ्यावर असणाऱ्या स्थानिकांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी समुद्रात धाव घेतली. मात्र तिघांनाच वाचवण्यात यश आलं, तर तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अक्षय राखेलकर, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे अशी मृतांची नावे आहेत. तर उबेद खान, सोहम चव्हाण, रोहित पलांडे यांच्यावर आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथे बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यात आले होते. आनंद लुटण्यासाठी पर्यटक पाण्यात जातात आणि पाण्याचा अंदाज नसल्याने दुर्घटना होतात. त्यामुळे पर्यटकांनी स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये, असं आवाहन करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.