पुणे जिल्ह्यात विशेष मुलीवर बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर घटना झाली उघड

पुणे जिल्ह्यात विशेष मुलीवर बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर घटना झाली उघड

मुलीवर सहा महिन्यांपूर्वी गावातील एका तरूणाने बलात्कार केला असून पीडित मुलगी गरोदर राहिली आहे.

  • Share this:

पुणे, 13 ऑगस्ट : खेड तालुक्यातील कनेरसर हे गाव तसं आदिशक्ती रेणुका मातेचं उपपीठ म्हणून ओळखलं जातं. राज्यभरातून भाविक या देवीच्या दर्शनाला गर्दी करत असतात. मात्र या गावातील एका नराधमाच्या कुकृत्याने गावाची बदनामी झाली आहे. कारण एका विशेष मुलीवर सहा महिन्यांपूर्वी गावातील एका तरूणाने बलात्कार केला असून पीडित मुलगी गरोदर राहिली आहे.

पीडित मुलगी तेव्हा अल्पवयीन होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने याप्रकरणी खेड पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून खेड पोलिसांनी महेश दौंडकर ऊर्फ पिंट्या ( रा. कनेरसर, ता. खेड ) याच्यावर बलात्काराचा आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी विशेष मुलगी आहे. साधारण सहा महिन्यांपूर्वीच्या पीडितीचे आई वडील शेतात कामाला गेल्यावर व धाकट्या दोन बहिणी शाळेत गेल्यावर, संशयित आरोपीने तिच्या घरात जाऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याने स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर एकदोन वेळा बलात्कार केला. कोणास सांगितले, तर जीवे मारण्याची धमकीही त्याने या मुलीला दिली होती.

पीडित मुलीला पित्ताचा त्रास होऊ लागल्यावर आईवडिलांनी 4 ऑगस्ट रोजी डॉक्टरांकडे नेऊन उपचार केले. काही दिवसांनी तिला बरे वाटू लागल्यावर, आईने विचारले तेव्हा तिने हकिकत सांगितली. त्यानंतर आईवडिलांनी तिला एका महिलाश्रमात ठेवले. तिथे तिचे समुपदेशन करून, पुन्हा तिला विचारल्यावर तिने तशीच हकीकत सांगितली. त्यानंतर योग्य त्या कायदेशीर प्रक्रिया करून त्यांनी 11 ऑगस्ट रोजी रात्री फिर्याद दाखल केली.

या प्रकरणातील खऱ्या संशयित आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुलीच्या घरच्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप होत आहे. स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी अन्य व्यक्तीचे नाव पुढे करीत आहेत. तीच व्यक्ती पीडितेच्या आई वडिलांना घेऊन खेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. परंतु पोलिसांनी दोन तास बसवून तक्रार घेतली नाही, असे निवेदन एका सामाजिक कार्यकर्त्याने पुण्याचे जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांना दिले आहे.

पोलीसांनी सर्वांगीण चौकशी करून, पीडिता, संशयित आरोपी, आश्रमात नाव दिलेली व्यक्ती या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून, खरा दोषी आरोपी व त्याला साथ देणारे या सर्वांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 13, 2020, 3:05 PM IST

ताज्या बातम्या