सोलापूर, 25 जुलै : जागतिक ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून देण्यात येणारा ‘डॉ. ए पी जी अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार डिसले गुरुजी यांना जाहीर करण्यात आला आहे. कोरोना काळात महत्त्वाची जबाबदारी बजवणाऱ्या वॉरियर्सला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रणजित सिंह डिसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. 27 जुलैला रामेश्वरम येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. डिसले गुरुजींनी ट्विटरच्या माध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
खरं तर ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्न पहायला शिकवलं असे आदरणीय डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतोय.
— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) July 25, 2022
या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली हे मात्र निश्चित . pic.twitter.com/Z0MSIYFvKY
खरं तर ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्न पाहायला शिकवलं, असे आदरणीय डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली हे मात्र निश्चित, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. दरम्यान ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. माढा तालुका (Solapur News) प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. 2021 मध्ये अमेरिकन सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर.. ग्लोबर टीचर अवॉर्ड विजेते सोलापुरातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना आता अमेरिकन सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर झाली होती. अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट (Fulbright) स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली होती. ही प्रतिष्ठेची असलेली स्कॉलरशिप संपूर्ण जगभरातील एकूण 40 शिक्षकांना यंदा देण्यात आली होती. (Ranjitsinh Disale get Fulbright scholarship) लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत. याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे, असे डिसले गुरुजींनी सांगितले. पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती