आठवलेंचा भाजपला धक्का? औरंगाबाद नामांतराबाबत घेतली वेगळी भूमिका

आठवलेंचा भाजपला धक्का? औरंगाबाद नामांतराबाबत घेतली वेगळी भूमिका

भाजपकडून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला जात असतानाच भाजपलाही एक धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 जानेवारी : औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर असं करावं, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. यामध्ये शिवसेना हा पक्ष सर्वाधिक आघाडीवर होता. मात्र आता राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना हे नामांतर का केलं जात नाही, असा प्रश्न विचारला जात होता. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमच्या पक्षाचा या मागणीला विरोध असल्याचं जाहीर केलं. थोरात यांच्या या भूमिकेमुळे सरकारमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला.

नामांतरावरून काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद समोर आल्याने भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळालं. या मुद्द्यावरून भाजपकडून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला जात असतानाच भाजपलाही एक धक्का बसला आहे. कारण केंद्रात भाजपसोबत असलेल्या आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही या मागणीला विरोध दर्शवला आहे.

'औरंगाबादचे नाव तेच राहायला हवं. कुणीही ते नाव बदलण्याचा प्रयत्न करू नये. वर्षानुवर्ष हेच नाव प्रचलित आहे, तेच राहिले पाहिजे. कुणी नाव बदलण्याचं प्रयत्न केला तर आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्यात येईल,' असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

रामदास आठवले यांनी भाजपच्या मागणीविरोधात भूमिका घेतल्याने आता नवा राजकीय ट्वीस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात या नामांतराच्या मुद्द्यावर काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 3, 2021, 3:52 PM IST

ताज्या बातम्या