बुलडाणा, 5 ऑगस्ट : राम जन्मभूमी आंदोलनात सामील झालेल्या जेष्ठ कारसेवकाचा सत्कार झाला आणि लगेच हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मृत्यू झालेल्या या कारसेवकाचं नाव बल्लूजी उर्फ लक्ष्मीकांत मोहरील असून ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या ठिकाणी घडली आहे.
बल्लूजी मोहरील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक आणि सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांचं वय 77 होते. राम जन्मभूमी आंदोलनात ते 1987 पासून जोडले गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिराचं भूमिपूजन केलं. यानिमित्त मेहकर येथील श्रीराम मंदिरात रामजन्मभूमी आंदोलनात सामील झालेल्या 50 कारसेवकांचा सत्कार स्थानिक समितीने संध्याकाळी 5 वाजता आयोजित केला होता.
त्यावेळी बल्लूजी यांचा सत्कार झाला आणि ते खाली बसले. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत कळ आली त्यांना इतर कार्यकर्त्यांनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण त्याआधीच त्यांची प्राणज्योत आधीच मावळली होती. बल्लूजी मोहरीला हे पेशाने शिक्षक होते.
स्थानिक मे.ए. सो.हायस्कूलमध्ये त्यांनी नोकरी करून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये सक्रिय होऊन स्थानिक पातळी पासून ते उपजिल्हाध्यक्ष दी विराजमान झाले होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संघपरिवार हळहळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली आणि आप्त परिवार आहे.
राम मंदिर आंदोलनात तरुंगवासही भोगला....
कट्टर रामभक्त, 3 वेळा कारसेवा दिलेले आणि 1992 मध्ये अयोध्येवरून परत येत असताना उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे 8 दिवस तुरुंगवास भोगलेल्या लक्ष्मीकांत उर्फ बल्लूजी मोहरील यांनी आपला प्राण मेहकरातील बडा राम मंदिरातच सोडल्याची दुःखद घटना घडली. याशिवाय मेहकरातील नामांकित असलेल्या महेश अर्बन क्रेडीट सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. आज राममंदिराचा भूमिपूजन सोहळा असल्याने ते आनंदातच होते. मात्र सत्कार सोहळ्यादरम्यानच त्यांचं निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ram Mandir, RSS