रत्नागिरी, 04 डिसेंबर : मागच्या चार दिवसांपासून राज ठाकरे कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितल्यानंतर ते दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंनी रत्नागिरी दौऱ्यवर असताना माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी शिवरायांवर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच त्यांनी राज्यातील मूळ प्रश्नाना बगल देण्यासाठी असेल चुकीची वक्तव्ये करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
सध्या मी काही दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. लोकांच्या चेहऱ्यावर मला पॉझिटिव्ह सिग्नल दिसत आहे. त्यामुळे मी येत्या जानेवारीत कुडाळ, चिपळून किंवा रत्नागिरी येथे जंगी सभा घेणार आहे. यासाठी मी कोकणातील रत्नागिरीसह अन्य ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आलो आहे. राज्यातील वातावरण सध्या दुषीत करण्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचा इतिहास सांगून मूळ मुद्दा बाजूला ठेवण्याचे काम या लोकांकडून सुरू असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : (भाजप आणि शिंदे गटात चाललंय काय? राऊतांचा खळबळजनक दावा )
राज ठाकरे पुढे म्हणाले की, मला कधी कधी वाटतं की राज्यपालांना असं बोलण्यासाठी कोणी सांगत की काय? नवीन वाद उकरून काढून लक्ष वळविण्यासाठी व्यूहरचना सुरू आहे का? असा प्रश्न पडतो. कोणीही उठावं आणि इतिहासावर बोलावं असं करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त वाद करत बसायचे आहे. इतिहासाला डाग न लागता चित्रपट बनवले पाहिजेत, असे ते म्हणाले.
रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणले की, महाराष्ट्रातून आता प्रकल्प बाहेर जाणे परवडणारे नाही. कोकणासारख्या निसर्गसंपन्न भागात प्रकल्प होऊ नये असं आजही वाटत. जमीनविक्री होत असताना स्थानिकांना संशय का येत नाही. जनतेनं जागृत राहणं गरजेचं आहे.
हे ही वाचा : ‘स्टेअरिंग माझ्याच हाती’ फडणवीसांनी कार चालवली अन् शेजारी बसले मुख्यमंत्री शिंदे, VIDEO
प्रकल्प जाहीर झाल्यानंतर डोळे उघडतात. कोकणाचं हित न साधणाऱ्यांना मतदान होतं. जो राग व्यक्त करणे अपेक्षित आहे, तो व्यक्त होत नाही. जनता शांत बसते हे नेत्यांच्या पथ्यावर पडतं, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा गावागावात निर्माण झाल्या पाहिजेत घराघरात आपल्याबद्दल विश्वास निर्माण व्हायला हवा हे लक्षात ठेवा असेही खडे बोल राज ठाकरे यांनी पदाधिकारी बैठकीत आज लांजा येथे सुनावले आहेत.