मुंबई, 30 सप्टेंबर : राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला चालना मिळाली आहे. मागच्या दोन दिवसांपासून पंजाब, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थानच्या काही भागातून मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. हा पाऊस महाराष्ट्रातून जायला 5 ऑक्टोबर उजाडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने कोल्हापूरसह कोकण, सातारा, सांगली जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांत सोमवारपर्यंत पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्याच्या काही भागांत सोमवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये कोल्हापूरसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या भागांचा समावेश आहे.
हे ही वाचा : नाशिकमध्ये पावसाची जोरदार बॅटींग, काही मिनिटांमध्ये रस्त्यांवर साचले तळे, Photos
विदर्भासह राज्यातील विविध भागात परतीच्या पावसाने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. परतीच्या पावसाची देशात पहिल्यांदा राजस्थानात चाहूल लागली असली तरी मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात पावसाने हलकी झलक दाखवली असली, तरी पुढील तीन दिवस राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
याचबरोबर राजस्थानात परतीच्या पावसाची चाहूल लागली असली तरी परतीच्या पावसाची पुरेशी आगेकूच झालेली दिसत नाही. यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. परंतु राज्यातील विविध भागात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार असला, तरी त्याचा सध्याचा वेग पाहता त्याला राज्यात येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Shocking! नागपुरात चिमुकल्यांच्या प्ले एरियात घुसून अजगराने केली शिकार; अंगावर काटा आणणारा VIDEO
29 सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा व गडगडाटासह विखुरलेल्या भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, ठाणे जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता जाणवते.