पुणे, 11 फेब्रुवारी : सध्या देशभरात Valentine Week साजरा केला जात आहे. Rose Dayच्या निमित्ताने पुण्यात एक मजेशीर प्रकार समोर आला होता. यादिवशी पुणे पोलिसांनी एका तरुणाला खास गिफ्ट देण्याचं वचन दिलं होतं. त्या दिवशी या तरुणाने हेल्मेट घातले नव्हते. पुणे पोलिसांनी याला पकडल्यानंतर या तरुणाने हेल्मेट घालू न शकल्याचे कारण सांगितले. दुचाकीवरुन पडल्याने या तरुणाचे हेल्मेट तुटले होते. त्यामुळे तो हेल्मेट घालू शकत नव्हता. शिवाय महिन्याचं पॉकेटमनी संपल्याने तो नवं हेल्मेटही खरेदी करू शकत नव्हता, असं सर्व प्रामाणिकपणे त्या तरुणाने पोलिसांना सांगितले. या महिन्यात मला विनाहेल्मेटसाठी दंड करू नका, मी पुढल्या महिन्यात नक्की हेल्मेट विकत घेईन पण या महिन्यात शक्य होणार नाही; अशा आशयाचा संदेश त्याने पुणे पोलिसांना ट्विट केला होता. यावर पुणे पोलिसांनी त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेलं हेल्मेटचं गिफ्ट देण्याचं ठरवलं. आणि सोमवारी कमिशनर कार्यालयात येण्याच आवाहन केलं होतं.
पुणे पोलिसांनी आपलं वचन पाळलं आहे. आणि Teddy day च्या दिवशी त्याला नवं कोरं हेल्मेट देऊ केलं आहे. याचा एक फोटो पुणे पोलिसांनी ट्विट केला आहे. काल सोमवारी तेजस येवतेकर हा पोलीस कमिशनर कार्यालयात गेले. तेथे याला हेल्मेट देण्यात आलं. पुणे पोलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांनी तरुणाला हेल्मेटचं गिफ्ट दिलं आहे. दिलेलं वचन पाळणं म्हणजेच खरं प्रेम करणं! आम्ही तेजस येवतेकरला दिलेलं वचन पाळलं, टेडी बेअरपेक्षा हेल्मेट एक चांगल गिफ्ट आहे, नाही का? असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. या कामामुळे पुणे पोलिसांचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. पुणे पोलिसांना सलाम, उल्लेखनीय कामगिरी अशा स्वरुपाची प्रतिक्रिया येत आहे. एका वाचकाने तर माझ्याकडे हेल्मेट आहे पण बाईक नाही ती देणार का, असं खोचकपणे विचारलं आहे.