मुंबई, 27 ऑक्टोबर : 'कोविड -19 या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करु नये,' असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयाच्या संघटनेला केलं आहे.
अमित देशमुख यांनी आज खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, एसएनबीटी एज्युकेशनल ट्रस्टचे डॉ. हर्षल तांबे, यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांवर फी वाढीचा बोजा लादणे योग्य होणार नाही आणि त्यामुळेच या शैक्षणिक वर्षात कोणतीही अतिरिक्त फी वाढ करण्यात येऊ नये यासाठी आपण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी देखील प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत.
दरम्यान, लॉकडाऊन काळातही काही शैक्षणिक संस्थांनी फी वाढवण्याचा निर्णय घेतल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. काही शहरांमध्ये पालक या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे आता मंत्र्यांनीच याबाबतचे आदेश दिल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कसा प्रतिसाद देतात, हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Private medical colleges