अविनाश कानडजे, प्रतिनिधी खुलताबाद, 17 जून : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा घडवणारील मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अचानक छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे. एवढच नाही तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुलंही अर्पण केली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं आहे. असं असताना त्यांनी औरंगाबादला जाऊन औरंगजेबाच्या कबरीला का भेट दिली? असा प्रश्न उपस्थित होतोय. ‘भारताच्या दृष्टीकोनातून खुलताबाद हे ऐतिहासिक शहर आहे, त्याचा लोकांनी विचार करावा. नावावरून भांडण लावण्याचा प्रकार चालला आहे, त्यांना एवढच सांगतो औरंगजेबाने 50 वर्ष राज्य केलं, ते कुणाला मिटवता येणार नाही’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ‘औरंगजेबाचं राज्य आलं ते जयचंदमुळे आलं हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. असे जयचंद बऱ्याच हिंदू राजांमध्ये होते, त्यांना तुम्ही शिव्या का घालत नाही? ही ताकद दाखवा ना. ज्यांनी या देशाला गुलाम केलं त्यांची निंदा करा, असेल ताकद तर करून दाखवा’, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून औरंगजेबावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. राज्याच्या काही भागांमध्ये औरंगजेबाची पोस्टर्स मिरवणुकीमध्ये झळकवली गेली तर काही ठिकाणी सोशल मीडियावर औरंगजेबाचं उदात्तिकरण करणारी स्टेटस ठेवण्यात आली, यानंतर तणाव वाढला होता. कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चाही काढला होता. आता प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.