बायको 3 वर्षं होती गायब; नवऱ्याने झिजवल्या कोर्टाच्या पायऱ्या, पण आता पोलिसांनी केला वेगळाच खुलासा

बायको 3 वर्षं होती गायब; नवऱ्याने झिजवल्या कोर्टाच्या पायऱ्या, पण आता पोलिसांनी केला वेगळाच खुलासा

हायकोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढत तपास करून शिर्डीत मानव तस्करी होते का, याचा सखोल तपास‌ करण्याचे आदेश दिले होते.

  • Share this:

शिर्डी, 29 डिसेंबर : शिर्डीतून 3 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. सदर महिला आपल्या प्रियकरासोबत निघून गेल्याचा दावा पोलिसांनी केला. मध्यप्रदेशमधील इंदूर येथील मनोज सोनी यांची पत्नी दिप्ती शिर्डीतून बेपत्ता झाली होती. महिलेचा पती मनोज सोनी यांनी 3 वर्ष या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. पोलीस बेपत्ता प्रकरणाचा तपास योग्य करत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मनोज सोनी यांनी याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने तपासाबद्दल पोलिसांवर ताशेरे ओढले होते.

10 ऑगस्ट‌ 2017 रोजी इंदूर येथील मनोज सोनी पत्नी दिप्ती सोनी सोबत शिर्डीत साईदर्शनासाठी आले होते. सदर महिला या‌ दरम्यान बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्याची तक्रार मनोज सोनी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात‌ केली. मात्र पाठपुरावा करूनही पोलीस योग्य तपास करत नसल्याने मनोज याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. हायकोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढत तपास करून शिर्डीत मानव तस्करी होते का, याचा सखोल तपास‌ करण्याचे आदेश दिले होते.

पोलीस तपास सुरू होता, परंतु दिप्तीचा कुठेच ठावठिकाणा लागत नव्हता. 17 डिसेंबर 2020 रोजी दिप्ती सोनी या मनोज सोनी यांच्या बहिणीला तिच्या घरासमोर सापडली. दिप्ती हिने स्मृतीभ्रंश झाल्याचा कांगावा करत माहिती लपवली होती. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. दिप्ती शिर्डीतून कोपरगाव त्यानंतर रेल्वेने पुणे येथे पोहचली. तेथून तिने तिचा प्रियकर ओमप्रकाश चंदेल यास फोन केला आणि त्यानंतर ते दोघेही इंदूरला गेल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांनी पत्रकार परिषद घेत हा खुलासा केला आहे.

हायकोर्टाने लक्ष घातल्याने दिप्ती सोनी प्रकरणात पोलिसांनी जंगजंग पछाडलं. पोलीस सातत्याने मागावर असल्याचे आणि दिप्तीचा प्रियकर ओमप्रकाश हा पोलिसांच्या रडारवर असल्याने ओमप्रकाश चंदेल आणि दिप्ती यांनी स्मृती‌भ्रंश झाल्याचा बनाव करत नाटकी पद्धतीने मनोज यांची बहिण किर्ती हिच्या घरासमोर थांबली. मनोज यांच्या बहिणीने तिला ओळखले आणि मनोज सोनी यांना ‌ती सापडल्याची माहीती दिली. त्यानंतर शिर्डी पोलिसांना कथित बेपत्ता झालेल्या दिप्ती सोनी हिला हायकोर्टासमोर हजर ‌केले त्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास करत प्रकरणाचा आज खुलासा केला आहे.

या प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केला असला तरी दिप्ती आणि तिचा प्रियकर ओमप्रकाश चंदेल याच्या विरोधात पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. मिसिंगचा सर्व तपास झाला असून हे सर्व प्रेम प्रकरणातून झाल्याने आम्ही कोणतीही कारवाई सध्या करणार नसल्याचे दिपाली काळे यांनी सांगितलं आहे.

कशी झाली दिप्ती सोनी बेपत्ता ?

दीप्ती सोनी स्वतः शिर्डीतून कोपरगावला गेली. तेथून रेल्वेने पुण्याला गेली. पुण्यातून प्रियकर ओमप्रकाश चंदेल याला बोलावून घेतले आणि दोघे मध्यप्रदेशला निघून गेले. शिर्डी पोलीस तपास करत असताना दिप्ती हनुमानाची भक्ती करायची असे समजले. त्या अनुषंगाने पोलिसांनी ज्या हनुमान मंदिरात दीप्ती जायची तिथे हनुमान गाथा सांगणाऱ्या ओमप्रकाश चंदेल याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस वारंवार चंदेल यांच्याकडे विचारणा करत असल्याने आता आपण फसणार असे वाटल्याने चंदेल याने दीप्तीला स्मृतीभ्रंश झाल्याचे नाटक करायला सांगितले आणि तिला तिच्या बहिणीच्या गल्लीत नेऊन सोडले. त्याचवेळी बहिणीला दीप्ती आढळून आली. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी तिला ताब्यात घेत औरंगाबाद उच्च न्यायालयात हजर केले.

Published by: Akshay Shitole
First published: December 29, 2020, 8:42 PM IST

ताज्या बातम्या