मुंबई, 14 एप्रिल : गेल्या काही काळापासून पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खून, दरोडा इथंपासून ते एटीएम फोडण्यापर्यंतच्या घटना शहरात वारंवार घडत आहेत. त्यातच आता लॉकडाऊन असतानाही हे प्रकार कमी होताना दिसत नाहीत. लॉकडाऊनचा फायदा घेण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील भुरटे चोर सक्रिय झाल्याचं बघायला मिळत आहे. लॉकडाऊन असल्याने इतर दुकाने बंद आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा देण्यासाठी म्हणून किराणा दुकानांचा व्यवहार अजूनही सुरू आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत चोरट्यानी किरणा दुकानांना लक्ष्य केल्याचं दिसत आहे. पिंपरीतील रावेत परिसरात किराणा दुकानाचं शटर उचकटून चोरी करणाऱ्या दोन अज्ञात चोरांचं कृत्य सीसीटीव्हीत कैद झालं आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी या चोरट्यांनी तोंडावर मास्क लावून चोरी केल्याचही या दृश्यात दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांचे रावेत येथील शिंदेवस्ती मध्ये नारायणी शॉपिंग मॉल नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांनी गुरुवारी रात्री दहा वाजता दुकान कुलूप लावून बंद केले होते. मात्र रात्री उशिरा पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून आठ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच दुसऱ्या ठिकाणी चोरी करून सहा हजार रुपये चोरून नेल्याचीही माहिती समोर येत असून या घटनांचा रावेत पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनचा फायदा घेत पिंपरी चिंचवड मधील ATM फोडणाऱ्या चोरांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं उघड झालं होतं. काही अज्ञातांनी पिंपरीतील भोसरी एमआयडीसी परिसरात असलेले ऍक्सीस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आली होती. संपादन - अक्षय शितोळे