प्रमोद पाटील, प्रतिनिधी पेण, 17 जुलै : गटारीचं सेलिब्रेशन दोन भावांच्या जीवावर बेतलं आहे. अलिबाग तालुक्यातील थेरोंडे येथील इलान बेंजामिन वासकर आणि इजराईल बेंजामिन वासकर या दोघांचा मृत्यू झाला आहे. यातला इलान 25 वर्षांचा तर इजराईल 23 वर्षांचा होता. हे दोघं पेण तालुक्यातील पाबळ विभागातील कोंडवे धबधब्यावर गेले होते, पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते वाहून गेले. दोन्ही भावांची डेडबॉडी मिळाली असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. राज्यभरात पावसाचा जोर वाढल्यामुळे ठिकठिकाणी धबधबे प्रवाहित झाले आहेत, त्यामुळे पर्यटक मोठ्या उत्साहात निसर्गाच्या सानिध्यात जात आहेत, पण सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत.
नांदगावमध्येही अपघात दुसरीकडे कृषी विद्यालयातील विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नांदगावच्या जातेगावमध्ये घडली आहे. सागर कांदे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. शेततळ्यावर शिक्षकांनी मास काढायला पाठवलं होतं, असा आरोप विद्यार्थ्याच्या नातेवाईकाने केला आहे. शिक्षकावर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी नातेवाईक आक्रमक झाले होते. त्यांनी मुलाचा मृतदेह रस्त्यावर ठेवून गंगाधरी बायपासवर रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर पोलीस आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतलं.