पालघर, 6 सप्टेंबर : पालघरमधील वाडा तालुक्यात आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. मात्र यावेळी वीज अंगावर पडून अंबिस्ते येथील 17 वर्षीय सागर शांताराम दिवा या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्या सोबतचे 5 तरुण जखमी झाले आहेत.
रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. पावसापासून संरक्षणासाठी हे सर्व तरुण एका झाडाखाली जमा झाले होते. यावेळी सागर शांताराम दिवा या तरुणाच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याच्या सोबतचे संदिप अंकुश दिवा (वय 25), अनंता चंद्रकांत वाघ (वय 24), रविंद्र माधव पवार (वय18), नितेश मनोहर दिवा (वय 19) व सनी बाळु पवार (वय 18) हे जखमी झाले आहेत.
जखमींना खानिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
दुसरीकडे, डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज पडून जितेश हाल्या तुंबडा (वय 22) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसंच अनिल सुधाकर धिंडा वय 20 जखमी झाला आहे. त्याला वेदांत हॉस्पिटलमध्ये आहे नेण्यात आले आहे. साईबाबा मंदिर येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या या दोघांवर वीज कोसळली होती.
दरम्यान, पावसाळ्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे वीजांसह पाऊस सुरू असताना सुरक्षेत ठिकाणी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात येत आहे.