उस्मानाबाद, 6 जानेवारी : उस्मानाबाद शहराचे मागच्या वर्षी धाराशीव असे नामकरण करण्यात आले. शहराची ग्रामदेवता असलेल्या देवीच्या नावावरुन धाराशिव हे शहराचं नामांतर झालं आहे. ग्रामदैवत धारासुर मर्दिनी हे एक जागृत देवस्थान आहे. महिषासुरमर्दिनी स्वरूपात जरी देवीची मूर्ती असली तरी देवीची मंदिरातील मूर्ती ही सिंहासनावर आरुढ अशी आहे. पूर्वी हे मंदिर छोट्या स्वरूपामध्ये होते. परंतु लोकांनी एकत्र येत लोकसहभागातून हे मंदिर मोठ्या स्वरूपामध्ये बांधले आहे. मंदिराच्या परिसरात दीपमाळ तसेच भव्य प्रांगण आहे.
अशी सांगितले जाते आख्यायिका
धाराशीव या उस्मानाबादच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे.
कोण कोणते कार्यक्रम येथे होतात?
दररोज पहाटे पाच वाजता देवीची आरती होते. नंतर दुपारी अकरा वाजता देवीला नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर परत सायंकाळी सात वाजता देवीची दुसरी आरती होते. दिवसभर भक्तांची दर्शनासाठी ये जा चालू असते. नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो. वैशाख पौर्णिमेला या ठिकाणी देवीची यात्रा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भरते. देवी छबिण्यामधून पूर्ण शहरभर मिरवणूक काढली जाते. ही देवी नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी आहे, असं पुजारी मल्हारी कदम यांनी सांगितलं.
कुठे आहे मंदिर?
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून दोन किमी अंतरावर आनंद नगर परिसरात आहे. मंदिर पहाटे 5 वाजता उघडते आणि रात्री 9 वाजता बंद होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.