संघर्ष यात्रा आज चिपळुणात, नारायण राणेही होणार सहभागी !

संघर्ष यात्रा आज चिपळुणात, नारायण राणेही होणार सहभागी !

  • Share this:

17 मे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाने राज्यात सुरू केलेली संघर्ष यात्रा आज (बुधवारी) चिपळुणात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते, 40 आमदार या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत.  विशेष म्हणजे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेही या यात्रेत सहभागी होणार आहेत.

युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. शेतकऱ्यांवर कर्ज झाल्यामुळे ते आत्महत्या करत आहेत. त्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधी पक्षाकडून पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकार कर्जमाफी देत नसल्यामुळे सरकारविरोधात विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. त्याची सांगता कोकणात होणार आहे.

रायगडमधून आज संघर्ष यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात येईल. त्यानंतर महाड तसंच  खेड तालुक्यातील भरणे या गावी ही संघर्ष यात्रा येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता सावर्डेमध्ये सभा होईल.  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही हजेरी असणार आहे.

दरम्यान,  या संघर्ष यात्रेचा हा चौथा टप्पा असून याचा उद्या सिंधुदुर्गात समारोप होणार आहे. या संघर्ष यात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे सहभागी होणार आहेत. त्यामुळे कोकणात या संघर्ष यात्रेला प्रतिसाद कसा मिळतो, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published: May 17, 2017, 10:11 AM IST

ताज्या बातम्या