सिंधुदुर्ग, 22 जानेवारी : साईबाबांच्या जन्मस्थानावरून सध्या शिर्डी विरुद्ध पाथरी असा वाद सुरू आहे. या वादामुळं देशभरात साईभक्तांमध्ये संभ्रमाचं वातावर आहे. असं असतानाच आता सिंधुदुर्गातील कुडाळजवळील कविल गावात साईंची सर्वात प्राचीन मूर्ती असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.असं असलं तरी साईंचं सर्वात प्राचीन मूर्ती असलेलं हे मंदिर प्रसिद्धीपासून दूर असल्याची खंत कविल गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
काय आहे साईबाबांच्या पहिल्या मंदिराची कथा ?
कविल गावातले रामचंद्र उर्फ दादा माडये दत्तभक्त होते. रामचंद्र माडये यांचे नातू राजन माडये यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आजोबाना दत्ताचा साक्षात्कार झाला आणि दृष्टांतात त्याना शिर्डीला येण्यास सांगण्यात आलं. त्यानुसार रामचंद्र माडये शिर्डीस गेले. त्यांना दत्तानं साईरुपात दर्शन दिलं आणि एका रुपयाचं नाणं त्यांच्या हाती ठेवलं. साईंनी दिलेला एक रुपया घेऊन माडये पुन्हा आपल्या कविल गावी परत आले. काही काळानं साईबाबानी शिर्डीत आपला देह ठेवला. ती तारीख होती 15 ऑक्टोबर 1918. एक वर्षानंतर माडये यानी कविल गावी साईबाबांची पहिली पुण्यतिथी केली. यासाठी त्यांनी बाबांनी दिलेला एक रुपया खर्च केला. त्यानंतर 1922 साली त्यांनी साईबाबांची पहिली मूर्ती घडवून घेतली. त्यानंतर साईंचं देशातील पहिलं मंदिर बांधून ती मूर्ती मंदिरात स्थापन केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. बाबुराव सारंग यानी घडवलेली ही मूर्ती साईबाबांची भारतातील पहिली मूर्ती आहे.
साईंची देशातील सर्वात पहिली मूर्ती असल्याचा दावा
सिंधुदुर्गातील कविल गावात साईंची देशातील पहिली मूर्ती आणि मंदिर असल्याचा दावा कविल ग्रामस्थांनी केला आहे. कविल गावात साईंचं मंदिर 15 ऑक्टोबर 1918 साली बांधण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी साईंची मूर्ती घडवण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर शिर्डीत साईंचं मंदिर 1954 नंतर बांधण्यात आलं. मंदिरात साईबाबांची फक्त समाधीआहे. साईबाबा हयात असताना त्यांच्या फोटोची पूजा केली जात होती. त्यामुळं साईंची ही मूर्ती भारतातील सर्वात पहिली मूर्ती असल्याचा दावा दादा माडये यांचे नातू राजन माडये यांनी केला आहे.
मंदिर परिसरात सोयीसुविधांची गरज
साईबाबांचे भारतातील पहिलं मंदिर असूनही शिर्डीप्रमाणे या मंदिराची प्रसिध्दी झाली नाही. तरीही इथं भारताच्या कानाकोपऱ्यातून साईभक्त येत असतात. उत्तर प्रदेश दिल्ली , झारखंड, मध्य प्रदेश, गोवा या राज्यातून साईभक्त इथं दर्शनासाठी येतात. त्यामुळं साईभक्तांसाठी मंदिर परिसरात भक्त निवास बांधावं अशी अपेक्षा माडये यांनी व्यक्त केली आहे. तसेच मंदिराकडे येणारे रस्त्यांचीही डागडुजी व्हावी अशी मागणी राजन माडये यानी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.