नागपूर,ता,1 जुलै : अखिल भारतिय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक घेतली जाणार नाही असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. महामंडळाच्या आज नागपूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळं गेली अनेक वर्ष होत असलेली मागणी मान्य झाली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महामंडळाच्या घटनेत दुरूस्ती करण्यात येणार असून त्याला सर्व घटक संस्थांची मान्यता महामंडळाला घ्यावी लागणार आहे. त्यानंतर हा निर्णय अंमलात येईल.
कशी करणार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड?
महामंडळ साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांशी आणि साहित्य संस्थांशी चर्चा करून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचं नाव ठरवणार आहे. मात्र त्याची नेमकी पद्धत काही दिवसांनी जाहीर होणार आहे. अध्यक्षपदासाठीचं नाव हे मोठं आणि सगळ्यांच्या आदराचं असेल असा प्रयत्न महामंडळाकडून होणार असला तरी त्यावरून साहित्य क्षेत्रात आणखी वाद-चर्चा झडण्याची शक्यता आहे.
साहित्य संमेलनाच्या निवडणूकीमुळं अनेक ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्षपदापासून दूर राहिले. साहित्याशी संबंध नसलेले मतदार, महामंडळाची दादागिरी, निवडणूकीतले आरोप-प्रत्यारोप, गट-तट यामुळं अध्यक्षपदाची निवडणूक गेली अनेक वर्ष वादाचं कारण ठरली होती.
त्यामुळं अनेक सुमार साहित्यिक अध्यक्षपदावर आलेत असाही आरोप होऊ लागला होता. साहित्यासारख्या क्षेत्रात निवडणूक नको, एकमतानं अध्यपद दिलं जावं असाही मतप्रवाह जोर धरू लागला होता. त्यामुळं महामंडळानं हा निर्णय घेतला आहे.
पुढचं संमेलन कुठे? यवतमाळ की वर्धा?
आगामी 92वं अ.भा. साहित्य संमेलन हे विदर्भात होणार असून यवतमाळ आणि वर्धा इथून निमंत्रणं आली आहेत. महामंडळाची एक समिती या दोनही ठिकाणची पाहणी करणार असून त्यानंतर संमेलन कुठे घ्यायचं याची घोषणा होणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi, Marathi literature festival, Nagpur, Sahitya sammelan adhyaksha