औरंगाबाद, 15 एप्रिल : औरंगाबादमध्ये (Aurangabad) बुधवारी सलून चालकाचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांच्या (Police) मारहाणीत फिरोज खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. तसंच मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांविरोधात आक्रमक भूमिका घेत मृतदेह थेट पोलीस स्थानकातच नेला. मात्र आता एक सीसीटीव्ही व्हिडिओ (Salon cctv cideo) समोर आला असून या सगळ्या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण डोक्याला गंभीर दुखापत हे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र सलून चालक फिरोज खान हे पोलिसांशी बोलताना चक्कर येऊन पडल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओत दिसत आहे. तसंच फिरोज खान यांना पोलिसांनी मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये तरी दिसत नाही. या सीसीटीव्ही व्हिडिओमुळे आता या घटनेनं नवं वळण घेतलं असून यापुढे आणखी काय खुलासा होतो, हे पाहावं लागेल.
नेमकं काय आहे प्रकरण? पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत बुधवारी मृताच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पोलीस ठाण्यातच आणून ठेवला. औरंगाबादमधील उस्मानापुरा पोलीस ठाण्यामध्ये ही घटना घडली. दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत मृताच्या नातेवाईकांनी याठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्यांच्या आवारात गर्दी केली. उस्मानपुरा परिसरात निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र फिरोज खान यांचे सलून सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई केली. याठिकाणी निर्बंध असताना फिरोज खान यांचे दुकान सुरू होते, त्यावेळी कारवाई न करता पोलिसांनी खान यांना मारहाण केली गेली आणि या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप खान यांच्या नातेवाईकांनी केला. नातेवाईकांनी थेट ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर हे आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांचं पथक सदर ठिकाणी दाखल झाले होते.