स्वप्निल घाग, प्रतिनिधी रत्नागिरी, 19 जुलै : कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यातील नदी नाले ओसांडून वाहत आहेत. रत्नागिरीतील वाशिष्टी नदी आणि खेडमधील जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहेत. नदीपात्रातील पाणी चिपळूणच्या काही सकल भागात शिरलं आहे. वाशिष्टी आणि जगबुडी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, चिपळूणमधील वाशिष्टी नदीच्या पुरात अडकलेल्या एका व्यक्तीला NDRF ने जीवदान दिले आहे. या बचावकार्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांना पूर आलाय. असे असताना चिपळूणच्या वाशिष्टी नदीमध्ये वाहून जाणारा एक जण झुडपात अडकला होता. त्या व्यक्तीला NDRF च्या जवानांनी मोठ्या शर्तीने बाहेर काढत जीवदान दिले आहे. ही व्यक्ती नेमकी नदीत कशी पडली? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.
चिपळूणमधील वाशिष्टी नदीच्या पुरात अडकलेल्या एका व्यक्तीला NDRF ने दिले जीवदान#Vashishti pic.twitter.com/OBGSrTgMNL
— News18Lokmat (@News18lokmat) July 19, 2023
चिपळुणात रात्रीच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. तसेच, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. पु़ढचे तीन ते चार दिवस अशी स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे. वाचा - लोकल रखडली, ट्रॅकवरून पायी जाताना हातातून 4 महिन्याचं बाळ पाण्यात पडलं, ठाकुर्ली जवळील ह्रदयद्रावक घटना वाशिष्ठी नदीपात्रात न जाण्याचा नागरिकांना इशारा रत्नागिरीतील कोळकेवाडी धरण आणि धरण परिसरात काल रात्री 8 वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सद्यस्थितीत महाजेनकोचे चारपैकी तीन युनिट चालू असल्यामुळे वक्रदारद्वारे सांडव्यावरुन पाणी विसर्ग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोलादवाडी नाला आणि वाशिष्ठी नदी पात्रालगत नागरिकांना न जाण्याचा इशारा देण्यात यावा, असे पत्र कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग आलोरेचे उपविभागीय अभियंता यांनी कोळकेवाडी, नागवे, आलोरे, पेंढाबे, खडपोली, पिंपळी खु., पिंपळी बु., सती आणि खेर्डी सरपंचांना पाठवलं आहे. पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या मुसळदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.