मुक्ताईनगर, 11 एप्रिल : भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसनेची बाबरी पाडण्यात कोणतीच भूमिका नव्हती असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मी कार सेवक म्हणून दोन वेळा अयोध्येला गेलो आणि पोलिसांचा मारही खाल्ला असं म्हटलंय. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता यावरून वाद सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री शिंदेंसह भाजपवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं की, आयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्यासाठी जी काय बाबरी मशीद तोडली त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. दोन वेळा मी कार सेवक म्हणून अयोध्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी पोलिसांचा भरपूर मार ही मी खाल्लेला आहे. कोण यामध्ये होतं, कोण नव्हतं हे मला माहित आहे. कारण मी दोन्ही वेळा गेलो, पंधरा दिवस मी तुरुंगामध्ये होतो. त्यामुळे मला माहित होतं की कोण कोणत्या पक्षाचे कोणते लोक त्या ठिकाणी होते. यामुळे या विषयावर अधिक न बोललेलं बरं. तुम्ही कुणाला जोडे मारणार आता? उद्धव ठाकरेंची पाटलांच्या राजीनाम्याची मागणी राज्यात २०२४ मध्ये पुन्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल असंही एकनाथ खडसे म्हणाले. राज्यात तीनही पक्ष एकत्र राहतील आणि महाविकास आघाडी मजबूत आहे. तीन पक्ष एकत्र राहणं अवघड असल्याचं चंद्रकांत दादांचं म्हणणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. यावेळी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ३२ पक्ष एकत्र होते याचं उदाहरण सांगितलं. जर ३२ पक्ष एकत्र राहिले असतील तर तीन पक्ष एकत्र न राहण्याचं कारण काय असा प्रश्न त्यांनी विचारला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.