जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अजित पवार स्वत:चाच एक डायलॉग विसरले आणि शरद पवारांशी घेतला पंगा!

अजित पवार स्वत:चाच एक डायलॉग विसरले आणि शरद पवारांशी घेतला पंगा!

अजित पवार स्वत:चाच एक डायलॉग विसरले आणि शरद पवारांशी घेतला पंगा!

शरद पवारांची साथ सोडताना अजित पवार स्वत:चाच एक डायलॉग विसरले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 नोव्हेंबर : महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार, हे आता निश्चित झालं आहे. मात्र त्याआधी महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. अजित पवार यांचं अचानक बंड…भाजपला पाठिंबा…उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी अन् पुन्हा राजीनामा, यामुळे देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे वेधलं गेलं. अजित पवारांनी अचानक शरद पवार यांची साथ सोडून भाजपशी सलगी केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे अजित पवार यांनी नेमकी का बंडखोरी केली? हा राज्यभर चर्चेचा विषय झाला. राज्यातील नेतृत्वावरून राष्ट्रवादीत सुरुवातीपासूनच सुप्त संघर्ष होता. शरद पवार हे दिल्लीत सक्रीय असल्याने राज्यात पक्षाची धुरा कुणाकडे जाणार यावरून अजित पवार की सुप्रिया सुळे काहीशी स्पर्धा असल्याची चर्चा झाली. मात्र शरद पवार यांनी अत्यंत हुशारीने सुप्रिया सुळे यांनाही लोकसभेत संधी दिली तर राज्यातील पक्षसंघटनेत अजित पवार यांच्याकडे अधिकार दिले. मात्र तरीही काका-पुतण्यामध्ये काही निर्णयावरून मतभेद होत असल्याच्या बातम्या समोर येतच राहिल्या. मात्र शरद पवार यांनी वेळोवेळी कुटुंबातील हा संघर्ष चार भिंतींमध्येच संपवला. यंदाच्या विधानभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. तसंच भाजप आणि शिवसेनेची निवडणूकपूर्व युतीही मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून तुटली. त्यामुळे राज्यात सरकार स्थापनेचा पेच कसा सुटणार आणि मुख्यमंत्री कुणाचा होणार, याबाबत सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली. भाजपला की शिवसेना, कुणाला पाठिंबा द्यायचा या मुद्द्यावरून राष्ट्रवादीत मतभेद झाले आणि यातूनच मग अजित पवारांनी बंड केलं. शरद पवारांची साथ सोडताना अजित पवार स्वत:चाच एक डायलॉग विसरले. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यासह देशात भाजपचं सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मतदारसंघात गेल्यावर अजित पवार नेहमी एक डायलॉग वापरायचे. ‘वस्ताद पैलवानाला सर्व डाव शिकवतो मात्र एक डाव नेहमीच राखून ठेवतो,’ हा तो डायलॉग. याआधारे पक्ष सोडून गेलेल्या लोकांना अजित पवार इशारा द्यायचे की, ‘मी भलेही तुम्हाला राजकारणात जिंकायचं कसं हे शिकवलं असेल पण एक डाव राखून ठेवलेला आहे.’ मात्र अजित पवार स्वत:च शरद पवारांबाबत हा डायलॉग विसरले आणि त्यांचा घात झाला. कारण शरद पवारांनी सूत्र फिरवली आणि काही आमदारांची साथ घेऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना अवघ्या 79 तासांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात