वाशिम, 16 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम पोलीस स्टेशनमध्ये नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.
समीर वानखेडे यांची तक्रार आणि वाशिम कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलिक यांच्याविरोधात अॅट्रोसिटी कायद्याखाली दुसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. याआधी मुंबईच्या गोरेगावमध्येही मलिकांविरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. हे आरोप करताना वानखेडे कुटुंबीयांबद्दल काही आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता, असा आरोप करण्यात आला. जात पडताळणी समितीकडे चार जणांनी वानखेडेंच्या विरोधात तक्रार केली होती. त्यामध्ये नवाब मलिक यांचाही समावेश होता.
या तक्रारीनंतर जात पडताळणी समितीने या प्रकरणाची चौकशी केली, यामध्ये समीर वानखेडे यांना दिलासा मिळाला. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचं कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला होता. यानंतर दिलासा मिळताच वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार केली.
नवाब मलिक अटकेत
नवाब मलिक हे सध्या अटकेमध्ये आहेत. गोवावाला कंपाउंड खरेदी आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, त्यामुळे हे मनी लॉन्ड्रिंग आहे, असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोपी ईडीने केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nawab malik