डोंबिवली, 2 फेब्रुवारी : ‘केवळ फोडाफोडीचे राजकारण करण्याचे काम विरोधकांचे राहिलेलं आहे. तुम्ही नगरसेवक फोडू शकता परंतु जनतेला फोडू शकत नाही . जनतेने गणेश नाईक या व्यक्तिमत्त्वावर गेले 25 वर्षे विश्वास ठेवलेला असून येत्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही गणेश नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचाच महापौर बसेल,’ असं म्हणत माजी खासदार संजीव नाईक (Sanjeev Naik) यांनी महाविकास आघाडीला जोरदार आव्हान दिलं आहे. भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा ओबीसी मोर्चाच्या वतीने एक दिवसीय भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन सोमवारी निळजे पलावा येथे करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार संजीव नाईक यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांत लागण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे राजकीय वातावरण नवी मुंबईत रंगू लागले आहे. हेही वाचा - शरजील उस्मानीवर कठोर कारवाई करा, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ‘जात, धर्म, वर्ण यापलीकडे जाऊन नवी मुंबईचा विकास गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नगरसेवकांनी केलेला आहे. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीच्या अगोदर काही सहकारी मला सोडून दुसऱ्या पक्षात जातात, परंतु नेतृत्व हे नाईक यांच्याकडेच राहिलेले आहे. आत्तासुद्धा भाजपचाच महापौर त्या ठिकाणी बसेल. गणेश नाईक यांच्या नेतृत्त्वाव्यतिरिक्त इतर कोणी येथे येऊ शकत नाही. गणेश नाईक विरुद्ध सर्वपक्षीय अशीच नवी मुंबईची निवडणूक होईल,’ असा विश्वास संजीव नाईक यांनी व्यक्त केला आहे. भाजप मनसेसोबत करणार युती? ‘भाजप मनसेसोबत युती करणार का याविषयी पक्ष योग्य तो निर्णय घेईल. पक्ष नेतृत्व हे स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊनच विचार करेल. परंतु आत्तापर्यंत असा कोणताही निर्णय झालेला नाही,’ अशी माहिती संजीव नाईक यांनी दिली आहे. भाजप ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्ता मेळाव्याला भाजप आमदार रविंद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष लक्ष्मण पाटील, गुरुनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली महिला अध्यक्ष पूनम पाटील यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.